धाराशिव : प्रतिनिधी
चोरीच्या गुन्हा असताना किरकोळ कारवाई करून तक्रारदाराला मदत केली होती. त्याचे बक्षीस म्हणून तक्रारदाराकडे ५ हजाराची लाच मागितली. तक्रारदाराकडून पंचासमक्ष ५ हजाराची लाच घेताना कळंब पोलीस ठाण्यातील परिविक्षाधीन पोलीस उपनिरिक्षासह पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दि. १९ जुलै रोजी दुपारी कळंब येथे केली. रामचंद्र किसन बहुरे व महादेव तात्याभाऊ मुंडे अशी लाच प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
एसीबीच्या पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंब पोलीस ठाण्यात रामचंद्र किसन बहुरे हे परिविक्षाधीन पोलीस उपनिरिक्षक तर महादेव तात्याभाऊ मुंडे हे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर येरमाळा नजिक उपळाई पाटी येथे तक्रारदाराचे दिनेश नावाचे व्हेज-नॉनव्हेज रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंट समोर काही दिवसापुर्वी ३ शेळ््या व दोन बोकड पोलीसांना बेवारस अवस्थेत आढळून आले होते. या शेळ््या व बोकड तक्रारदाराच्या ताब्यात असल्याने पोलीसांनी त्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा नोंद न करता महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११०, ११७ अन्वये किरकोळ कारवाई केली होती.
या प्रकरणात तक्रारदाराला पोलीसांनी मदत केली म्हणून परिविक्षाधीन पोलीस उपनिरिक्षक रामचंद्र बहुरे व हवालदार महादेव मुंडे यांनी दि. १९ जुलै रोजी पंचासमक्ष तक्रारदाराकडे ५ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीच्या कार्यालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सापळा रचण्यात आला होता. आरोपी महादेव मुंडे यांनी पंचासमक्ष ५ हजार रूपये लाच स्विकारली. यावेळी एसीबीच्या पथकाने आरोपी पोउनि बहुरे व पोह मुंडे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस ठाणे कळंब गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक तथा सापळा अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे यांनी पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली केली.️ सापळा पथकात पोलीस अमलदार सहाय्यक फौजदार इफ्तेकार शेख, मधुकर जाधव, नागेश शेरकर यांचा समावेश होता. एखादा लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन एसीबी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.