इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत. त्यांची तुरुंगातून सुटका व्हावी, यासाठी त्यांचे समर्थक पाकिस्तानात रस्त्यावर उतरले असून, देशभरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशात अनेक ठिकाणी हिंसक वळणही लागले आहे. अशावेळी पाकिस्तानच्या सरकारने आंदोलकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, आता इस्लामाबादमध्ये इम्रान समर्थक पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी थेट राजधानीलाच घेराव घातला. तत्पूर्वी इस्लामाबादचे रस्ते थेट कंटेनर उभे करून बंद करण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, या आंदोलकांना रोखण्याचे आदेश सैनिकांना दिलेले असताना थेट सैन्याचे जवान, अधिकारी आंदोलकांशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. तसेच एकमेकांना मिठ्या मारत आहेत. कंटेनरवर चढण्यासाठी मदतही करीत आहेत. त्यामुळे पाकिस्तानात वेगळेच चित्र निर्माण झाले असून, सैनिकांनी थेट आंदोलकांना साथ देण्याचे काम सुरू केल्याने देशात सत्तापालट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आंदोलकांना थांबविण्यासाठी इस्लामाबाद कंटेनर सिटीमध्ये रुपांतर झाले आहे. इम्रान खआन यांचे हजारो समर्थक इस्लामाबादच्या डी चौकात येण्यात यशस्वी ठरले आहेत. यावेळी अनेक सैनिक या लोकांना मिठ्या मारताना दिसत आहेत. पाकिस्तानी सैन्य कोणत्याही क्षणी पारडे बदलू शकते. त्यात जनतेचा संताप पाहता पाकिस्तानी सैन्य ही भूमिका घेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानात तख्तापालट होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.