19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeराष्ट्रीयबंगालच्या उपसागरात धडकणार चक्रीवादळ

बंगालच्या उपसागरात धडकणार चक्रीवादळ

दाना चक्रीवादळाचे संकट, पश्चिम बंगालसह ओडिशा, आंध्रला बसू शकतो फटका

मुंबई : प्रतिनिधी
अंदमान समुद्रातून तयार झालेले दाना चक्रीवादळ २३ ऑक्टोबरपर्यंत बंगालच्या उपसागरात पोहोचणार आहे. २४ ऑक्टोबर रोजी ते ओडिशा-पश्चिम बंगाल किनारपट्टीवर धडकेल. हवामान खात्याने चक्रीवादळाच्या लँडफॉलबाबत माहिती दिलेली नाही. त्याचा फटका पुरीला बसू शकतो, असा अंदाज आहे. सौदी अरेबियाने या वादळाला दाना हे नाव दिले आहे. दाना म्हणजे उदारता, असे सांगण्यात आले.

२३ ऑक्टोबरपासून ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर वा-याचा वेग ६० किलोमीटर प्रतितासपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. जो २४ ऑक्टोबरच्या रात्रीपासून २५ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत १२० किलोमीटर प्रतितास होईल. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, वादळ येण्याच्या एक दिवस आधी म्हणजे २३ ऑक्टोबरपासून मुसळधार पाऊस सुरू होईल. २४-२५ ऑक्टोबर रोजी ओडिशा-बंगालच्या किनारपट्टी भागात काही ठिकाणी २० सेमी पाऊस पडू शकतो.

काही ठिकाणी ३० सेमीपेक्षा जास्त म्हणजेच ११ इंच (एक फूट) पाऊस पडू शकतो.
हवामान खात्याने ओडिशा-बंगालमधील मच्छिमारांना २३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. आजपासून अंदमान समुद्रात कमी दाबाची स्थिती निर्माण झाल्याचे आयएमडीने म्हटले आहे. २२ ऑक्टोबरपर्यंत ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात खोल दबावात बदलेल. २४ ऑक्टोबरपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल, असे हवामान खात्याने सांगितले.

या चक्रीवादळाचा तीन राज्यांना फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर, पश्चिम मेदिनीपूर, दक्षिण २४ परगणा आणि उत्तर २४ परगणा येथे खूप मुसळधार पावसाची शक्यता आहे तर कोलकाता, हावडा, हुगळी आणि झारग्राममध्ये २३ ते २४ ऑक्टोबरदरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओडिशात २४ ऑक्टोबर रोजी पुरी, खुर्दा, गंजम आणि जगतसिंगपूर जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पावसासह (७ ते २० सें.मी.) अतिमुसळधार पाऊस (२० सेमी पेक्षा जास्त) आणि विजांचा कडकडाट होण्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच आंध्र प्रदेशातही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी ओडिशा सरकारने सर्व जिल्हाधिका-यांना अलर्टवर ठेवले आहे.

महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारी म्हणाले की, राज्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. ओडिशा आपत्ती जलद कृती दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी सज्ज आहेत.

तीन राज्यांना फटका बसणार
एकीकडे पावसाने हाहाकार केलेला असताना आता चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. अंदमान समुद्रात दाना नावाचे चक्रीवादळ तयार झाले असून, आता हे चक्रीवादळ २३ ऑक्टोबरपर्यंत बंगालच्या उपसागरात पोहोचणार आहे. त्यामुळे पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली असून, याचा फटका पश्चिम बंगालसह ओडिशा आणि आंध्र प्रदेशाला बसू शकतो. त्याचा असर इतरत्रही होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR