अमरावती : अमरावतीमधील संत्री उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या दशक्रिया विधीला गावकऱ्यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना आमंत्रण दिले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी बांधवाच्या दशक्रियेच्या आमंत्रणावरून मोदींवर निशाणा साधला आहे. वडेट्टीवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहात. मोठमोठ्या कार्यक्रमांचे आमंत्रण तुम्ही लगेच स्वीकारता, हा कार्यक्रम तसा आनंदाचा किंवा जाहिरातबाजी करणारा नाही. तरी पण आशा करतो की, तुम्ही आमंत्रण स्वीकाराल.
ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे कैवारी’ म्हणून तुम्ही आणि तुमचा पक्ष माध्यमांमध्ये मिरवतो. टीव्हीवर २४ तास जाहिराती चालतात. हे बघता आज तुम्ही आमच्या या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट नक्की घ्याल, ही आशा करतो. कांदा, कापूस, सोयाबीन, धान उत्पादक शेतकरी सुद्धा आपली वाट बघत आहेत की तुम्ही त्यांच्या ‘मन की बात’ ऐकाल, असे ते म्हणाले. अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील जरुडचे पद्माकर दारोकर हे संत्रा उत्पादक शेतकरी यांनी आत्महत्या केली आहे.
बांगलादेशातील संत्रा शुल्कवाढीमुळे निर्यात प्रभावित झाली. संत्र्याचे भाव कोसळले. विहिरीत उडी घेत त्यांनी आत्महत्या केली. १२ जानेवारीला त्यांचा दशक्रिया विधी होणार आहे. गावकऱ्यांनी पत्रिका छापून पंतप्रधानांना निमंत्रण दिले आहे. आपण महाराष्ट्र दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या भावना तुम्ही जाणून घ्याल ही त्यांची भाबडी आशा आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. १२ जानेवारी रोजी दशक्रियेचा कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. या कार्यक्रमाला भारत सरकारच्या सर्व मंत्र्यांसह लोकसभा राज्यसभेचे खासदार आणि आयात निर्यात धोरण ठरवणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनी उपस्थितीत राहावे अशी विनंती करण्यात आली आहे.