परभणी : पुर्ण संगीत संमेलनाच्या द्वितीय सत्रात संगीत क्षेत्रातील पुर्वापर चालत आलेले घराणे, त्यांचे बलस्थान, सौदर्यस्थळं रियाजाची पद्धती यावर प्रकाश टाकत त्या- त्या घराण्याचे अविष्कार सादर करण्यात आले. विख्यात हार्मोनियम वादक डॉ.चैतन्यजी कुंटे यांनी या परीचर्चेचे संचालन केले.
अष्टांग प्रधान गायकीसाठी प्रसिद्ध ग्वाल्हेर घराण्याच्या बलस्थानावर चर्चा करीत विश्वेश सरदेशपांडे यांनी बिहार रागाच्या माध्यमातून घराण्याच्या पारंपारिक गायकीचे सादरीकरण केले. धृपदगायनाची पार्श्वभूमी लाभलेल्या, उत्कृष्ट बंदिशीसाठी प्रचलित आग्रा घराण्याची लक्षणे स्पष्ट करीत केतकी चैतन्य या गायिकेने गायकीचे सादरीकरण केले. अतिंद्र सरवडीकर यांनी किराणा घराण्यातील प्रमुख गायकांची वैशिष्ट्य सांगून स्वरांचा लगाव, सुरेलपण, सरगमची परिणामकारकता विषयी माहिती दिली.
जयपूर अत्रौली घराण्यावर माहिती देत शिवानी दसवकर यांनी घराण्यातील आकारयुक्त गायकी, छुपी लयकारी, छुटतान वापरण्याची खासियत समजावून सांगितली. दिड तास सुरू असलेल्या या कार्यक्रमात हार्मोनियम संगत लिलाधर चक्रदेव तर तबला संगत पार्थ ताराबादकर यांची होती. सुत्रसंचालन विशाखा रूपल यांनी तर कलावंतांचा सत्कार किशोर पुराणिक, विश्राम परळीकर, सरिता आठवले यांच्या हस्ते करण्यात आला.