28.6 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरकबरीवरून वाद पेटला

कबरीवरून वाद पेटला

विहिंप, बजरंग दल आक्रमक, भाजपचेही समर्थन

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची मागणी अनेक संघटना, राजकीय नेते करू लागले आहेत. औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरीची पुनरावृत्ती करण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने दिला आहे. त्यातच धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे मिलिंद एकबोटे यांनी ही कबर नष्ट करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे त्यांना ५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात येण्यास बंदी घातली असून, कबर परिसरातील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ औरंगजेबाची कबर हटवा, अशी मोहीम विहिंप, बजरंग दलाने हाती घेतली. त्यामुळे वातावरण तापले आहे.

औरंगजेबाची कबर आमच्या गुलामगिरीची, लाचारीची आणि अत्याचारांची आठवण करून देते. महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढावी अन्यथा बजरंग दल स्वभिमानी हिंदू समाजाला घेऊन रस्त्यावर उतरेल, असा इशारा बजरंग दलाने दिला आहे. औरंगजेब याची कबर हटवली नाही तर पूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्व तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा बजरंग दलाने दिला.

कबरीला होत असलेला विरोध पाहता छत्रपती संभाजीनगरात असलेल्या औरंगजेबाच्या कबरीजवळील बंदोबस्त वाढवण्यात आला. या परिसरात राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी तैनात करण्यात आली. १५ कर्मचारी, २ पोलिस अधिकारी कबर परिसरात आहेत. कबर परिसरात २ ठिकाणी नाकेबंदी लावण्यात आली. २ ठिकाणी फिक्स पॉईंट उभारण्यात आले. कबर पाहायला जाणा-या पर्यटकांची कसून तपासणी केली जात आहे. त्यानंतर त्यांना आत सोडले जात आहे.

अनुचित प्रकार टाळण्यासाठी बंदोबस्त
छावा चित्रपटानंतर औरंगजेबाच्या कबरीचा वाद पेटला आहे. औरंगजेबाची कबर हटवण्याची भाषा अनेक राजकीय नेत्यांनी केली. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी या भागात बंदोबस्त वाढविण्यात आला असून, काही पोलिस साध्या वेशात तैनात आहेत.

राजकीय वादाला तोंड
औरंगजेबाची कबर इथे नको. कशासाठी पाहिजे, तो त्रास आम्हाला कशाला, असे प्रश्न शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी विचारले. या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेने याला विरोध केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी औरंगजेबसारखी एक बलाढ्य शक्ती होती. त्याच्याकडे प्रचंड पैसा, मनुष्यबळ, हत्ती-घोडे होते. इतकी मोठी ताकद असलेल्या माणसालासुद्धा या महाराष्ट्रात २७ वर्षे राहावे लागले, तरीही त्याला राज्य करता आले नाही. त्याचे प्रतिक औरंगजेबाची कबर आहे, असे म्हटले. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कबर हटविण्यास विरोध केला आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी औरंगजेबाची कबस सजविण्याची आवश्यकता काय, असा सवाल उपस्थित करीत विरोधकांवर हल्लाबोल केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR