काशी : एका नातेवाईकाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी बिहारहून काशीला निघालेल्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रवासादरम्यान हजारीबाग येथील चौपारणमधील दनुआजवळ एका भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला, तर १४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील बगोदर परिसरातील बियाँरो टांड येथून काही लोक एका नातेवाईकाचा मृतदेह घेऊन काशीला अंत्यसंस्कारासाठी निघाले होते. वाहनाच्या आत इतर नातेवाईक बसले होते. दरम्यान प्रवासात काही प्रवाशांना थांबायचं असल्याने चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या एका ट्रकने या वाहनाला जोरदार धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आणि आरडाओरडा झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत पोलिसांच्या मदतीने जखमींना चौपारण येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान ७ जणांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली.
१४ गंभीर जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी हजारीबाग येथील शेख भिखारी मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. एकाच कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
















