पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि पराक्रम साता समुद्रापार पोहोचलाय आणि त्यामुळेच महाराजांचे किल्ले पाहण्यासाठी परदेशातून नागरिक येत असतात. असेच पुण्यातील सिंहगडावर आलेल्या एका परदेशी पर्यटकाला महाराष्ट्रातील तरुणांच्या टोळक्याने चक्क शिवीगाळ करायला लावल्याचा एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आणि सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर वर जोरदार व्हायरल होतोय. त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेवर कलंक लावण्याचा प्रकार या तरुणांनी केलाय आणि त्यामुळे या तरुणांवर टीका सुद्धा केली जातेय.
व्हीडीओमध्ये एक परदेशी पर्यटक सिंहगडावर आला. आपल्या मोबाईलच्या माध्यमातून तो शूटिंग करतोय. न्यूझीलंड देशातून आलेला हा पर्यटक होता आणि यावेळी ते पर्यटक कुठून आलेत? ते कसे आलेत? हा मूळ परिचय सोडून त्या तरुणांनी त्याला अश्लील भाषेत बोलायला सांगितले. शिवीगाळ करायला सांगितली. मराठी भाषा येत नसल्याने आणि त्या शब्दांचा अर्थही माहित नसल्याने केवळ त्या तरुणांच्या सांगण्यानुसार या परदेशी पर्यटकाने ते शब्द उच्चारले. मात्र शिवीगाळ करत असताना आपण काहीतरी चुकीचे बोलत आहोत असे या पर्यटकाला वाटले कारण ते बोलून झाल्यानंतर ते तरुण हसत होते. अतिथी देवो भव अशी आपली महाराष्ट्राची संस्कृती पण आपल्या तरुणांनी त्यांना महाराजांचा अनुभव सांगण्याऐवजी शिवीगाळ करायला लावल्याचा प्रकार याठिकाणी घडला.
इथे पुन्हा येणार नाही : विदेशी पर्यटक
इथे पुन्हा येणार नाही असे त्या पर्यटकाने व्हीडीओमध्ये उल्लेख केला. महाराजांचे किल्ले सर करण्यासाठी इतर देशातून येणा-या पर्यटकांना अशा प्रकारची हीन दर्जाची वागणूक काही तरुण करताना दिसून येत आहेत. असेच या व्हीडीओमधून दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता आणि संस्कृती याला डाग लागला जातोय आणि त्यामुळेच यावर संतापही व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हीडीओ सध्या व्हायरल होत आहे. आता हा व्हीडीओ समोर आल्यानंतर या तरुणांवर काही कारवाई होईल का? हे पाहणेही महत्वाचे असणार आहे.