34.1 C
Latur
Sunday, March 30, 2025
Homeमहाराष्ट्रछत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर होणार हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर होणार हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

कोरेगाव भीमा : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त शनिवारी (दि. २९) श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे समाधिस्थळी पूजाभिषेक, मूक पदयात्रा, शासकीय पूजा, कीर्तन, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, धर्मसभा, पुरस्कार वितरण, रक्तदान शिबिर व छावा महानाट्यासह विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचे कार्यवाह मिलिंद एकबोटे, अध्यक्ष सोमनाथ भंडारे, समिती सदस्य अनिल काशिद, शांताराम भंडारे, सचिन भंडारे, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय भंडारे, संभाजी भंडारे, अनिल भंडारे, अ‍ॅड बाळासाहेब भंडारे आदी उपस्थित होते. धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती, वढू बुद्रुक ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात पहाटे ५ वाजता श्री छत्रपतींच्या तसेच कविकलश यांच्या समाधीची महापूजा होईल, तर सकाळी ७ वाजता मूकपदयात्रा होईल. सकाळी ८.३० वाजता शासकीय पूजा व ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांचे कीर्तन होईल, तर सकाळी ११.१५ वाजता शासकीय मानवंदना व वेदमंत्रपठणासह श्रीशंभू छत्रपतींच्या समाधीवर पुष्पवृष्टी होईल. सकाळी ११.३० वाजता धर्मसभा होईल.

धर्मसभेत श्रीक्षेत्र सरलाबेट येथील महंत परमपूज्य श्रीरामगिरी महाराज यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार प्रदान करण्यात येईल. सन्मानचिन्ह व ५१ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांना श्रीशंभूतेज पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सुधीर बाळसराफ, भारतीय कामगार सेना, सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ आणि महेश भुईबार यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शंभूसेवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी नांदेडहून ३०० शंभूभक्त अनवाणी पायाने दोन महिन्यांपासून प्रवास करून फाल्गुन अमावास्येला वढू येथे पोहोचणार आहेत.

मंत्र्यांसहित ‘छावा’ चित्रपटाच्या टीमची उपस्थिती
पुण्यतिथी कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, कॅबिनेटमंत्री चंद्रकांत पाटील, शिवेंद्रराजे भोसले, दत्तात्रय भरणे, बाबासाहेब पाटील, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ तसेच खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार ज्ञानेश्वर कटके, महेश लांडगे, दिलीप वळसे पाटील, माजी आमदार अशोक पवार आदींसह अनेक जण उपस्थित राहणार असून, यावेळी ‘छावा’ चित्रपटाचे निर्माते लक्ष्मण उतेकर व अभिनेता विकी कौशलसह टीमला तसेच धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजचे निर्माते शेखर रघुनाथ मोहिते पाटील व अभिनेता अनुपसिंह ठाकूर यांना धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे सरपंच ज्ञानेश्वर भंडारे व रेखा शिवले यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR