22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रआक्षेपार्ह मजकुराचे पत्र व्हायरल; संशयित दाम्पत्यास पकडले

आक्षेपार्ह मजकुराचे पत्र व्हायरल; संशयित दाम्पत्यास पकडले

नाशिक : पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलमध्ये डॉ. कैलास जगदीश राठी (४८) यांच्यावर शुक्रवारी (दि. २३) रात्री एकाने कोयत्याने सपासप वार करीत प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित राजेंद्र मोरे (वय ३७) याला टी पॉइंट येथे अटक केली. पत्नीची बदनामी केल्याच्या संशयातून हल्ला केल्याची कबुली संशयिताने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, आर्थिक कारणातून संशयिताने डॉक्टरवर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच संशयित राहात असलेल्या सोमवारपेठ परिसरात आक्षेपार्ह मजकूर असलेले पत्र व्हायरल झाल्याने राठींवर हल्ला झाल्याचा संशय वर्तवला जात आहे.

सुयोग हॉस्पिटल येथे शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास संशयित राजेंद्र चंद्रकांत मोरे याने डॉ. राठी यांच्यावर कोयत्याने वार करीत प्राणघातक हल्ला केला. डॉ. राठी यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करून पंचवटीतील अपोलो रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या पत्नीने पंचवटी पोलिस ठाण्यात संशयित राजेंद्र मोरेविरोधात फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार, दोन महिलांनी सुयोग रुग्णालयात नोकरीस असताना सुमारे सहा लाखांचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले होते. चौकशीनंतर एकीस कामावरून काढण्यात आले होते. तिने विनंती केल्यानंतर काही वर्षांनी पुन्हा कामावर घेत तिच्याकडे अन्य जबाबदारी देण्यात आली. या कालावधीत महिलेने डॉक्टर राठींकडून जमीन कामकाजासाठी १२ लाख रुपये घेतल्याचे समजते. त्यामुळे डॉ. राठी हे महिलेकडे १८ लाख रुपयांची मागणी करीत होते. या वादातून संशयित राजेंद्रने डॉक्टरांवर हल्ला केला. पंचवटीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी पथक नेमून संशयित राजेंद्र यास अटक करत चौकशी सुरू केली आहे.

आक्षेपार्ह मजकुराचे पत्रक
पोलिसांच्या तपासात सोमवारपेठ परिसरात काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह मजकूर असलेले पत्र व्हायरल झाले होते. यामुळे हे पत्र डॉ. राठी यांनी व्हायरल केल्याचा संशय संशयित राजेंद्र यास होता. पत्र हाती आल्यानंतर संतापाच्या भरात हल्ला केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी त्यादृष्टीनेही तपास सुरू केला आहे.

कठोर कारवाईची मागणी
डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) शनिवारी (दि. २४) पहाटे ते दुपारी बारापर्यंत रुग्णसेवा बंद ठेवली. हल्ल्याचे कारण उघड झाल्यानंतर रुग्णसेवा पूर्ववत करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR