सिन्नर : मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला सिन्नर येथे नायलॉन मांजामुळे एका व्यक्तीचा गळा चिरल्याची घटना घडली. उत्तम विष्णू आव्हाड (वय ५५, रा. वडझिरे, ता. सिन्नर) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास उत्तम आव्हाड हे संगमनेर नाक्याकडून वडझिरे येथे जाण्यासाठी निघाले होते.
त्याचवेळी पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याला अडकला. काही कळण्याच्या आत गळा चिरल्याने आव्हाड खाली पडले. आसपासच्या नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. मातोश्री हॉस्पिटलचे डॉ. गणेश सांगळे यांनी तातडीने उपचार सुरू केले.
तथापि जखम खोलवर असल्याने व नसा कापल्या गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. रक्तस्त्राव बंद करून प्राथमिक उपचारानंतर जखमीला नाशिक येथे हलविण्यात आले आहे. जखमी व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.