23.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार

रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार

खासदार नारायण राणे यांची माहिती

रत्नागिरी : कोकणातील तरुणांना कोकणातच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी रिफायनरी प्रकल्प गरजेचा आहे. हा प्रकल्प होण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यावर आपला भर असेल आणि त्यासाठी रिफायनरीच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढणार असल्याचे भाजपा खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ते पुढे म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात अनेक उद्योग येतील. एमआयडीसी होणार तसेच येथील मुलांसाठी इंजिनिअरिंगबरोबरच वेगवेगळे ट्रेड आणण्यात येणार आहेत. इथल्या मुलांना आधुनिक पद्धतीने मार्गदर्शन मिळावे, यासाठी तजवीज करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोकणात विवध प्रकारचे उद्योग सुरू व्हावेत, यासाठी आपले प्रयत्न असतील. कृषी उद्योगांना अधिक चालना आपण देऊ. उद्योगासाठी दळणवळण सुविधा गरजेच्या आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या अधिका-यांना बोलावून महामार्गाचा ठेकेदार कोण आहे, ते काम किती दिवसांत करणार आहात, याची कालमर्यादा मागणार आहे. २० दिवसांनी आपण याबाबतची बैठक लावणार असल्याचे ते म्हणाले.

कोळशापासून वीज बनविणा-या पन्नास कंपन्यांचे मालक उद्धव ठाकरे यांना भेटले. जैतापूर प्रकल्प सुरू न करण्यासाठी ते उद्योजक मातोश्रीवर गेले होते. कारण जैतापूर सुरू झाल्यास कोळशावर चालणारे वीज प्रकल्प बंद होतील. त्यांच्याशी उद्धव ठाकरे यांची आर्थिक तडजोड झाली असल्याचा गंभीर आरोप राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. आयएएस, आयपीएसमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांची संख्या वाढावी, यासाठी स्पर्धा परीक्षेसाठी वेगवेगळे मार्गदर्शन वर्ग सुरू करू, असेही राणे यांनी सांगितले.

उद्योगांवर भर
येथील लोकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी प्रक्रियेवर आधारित उद्योगधंदे सुरू केले पाहिजेत. स्थानिकांना त्यासाठी माध्यम उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. स्थानिक तरुणांना येथेच नोक-या मिळाल्या पाहिजेत. मोठ्या पगाराच्या नोक-या मिळतील तेव्हाच त्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडेल. त्यासाठी येथे वेगवेगळे प्रकारचे क्लासेस घेऊन तरुणांना प्रवृत्त करण्यात येईल, असे राणे यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR