मुंबई : मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटी शेजारील नागरमोडी पाडा येथील आंबेवाडी परिसरातील घरांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गोरेगाव पूर्व भागातील संतोष नगर भागात ही भीषण आग उसळली होती. गुरूवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास ही आग लागली असल्याचे समजते.
गोरेगाव येथे लागलेल्या या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग विझवण्याचे अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. संतोष नगर भागातील घरांमध्ये असलेल्या सिलिंडरचे एकापाठोपाठ स्फोट होत गेले आणि आग झपाट्याने वाढत गेली. या आगीत अनेक झोपड्या जाळून खाक झाल्या असल्याचे समजते. आग लागल्याचे समजताच येथील नागरिक तातडीने बाहेर पडले त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न बराच वेळ सुरू होता. सर्व संबंधित यंत्रणांना अलर्टवर ठेवण्यात आलेले आहे. घटनास्थळी गरज लागल्यास एक रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात आलेली आहे, अशी माहिती अग्निशमन दलाच्या एका अधिका-याने पीटीआयला दिली आहे.