नागपूर : अधिवेशनाची औपचारिकता पूर्ण करत सरकार पळ काढत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.
राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले. त्यानंतर नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, आम्ही संसदीय कामकाज समितीकडे अधिवेशन दोन दिवसांसाठी वाढविण्याची मागणी करत विदर्भ आणि मराठवड्यावर चर्चा व्हावी, असा प्रस्ताव दिला आहे. मात्र, हे सरकार घाईगडबडीत पुरवणी मागण्यांवर थातुरमातुर चर्चा करून त्या मंजूर करून घेत आहे. २०२२ पर्यंत या राज्यावर २ लाख कोटींचे कर्ज होते. आता हा आकडा दहा लाख कोटींच्या घरात पोहचला आहे. येथील उद्योग दुस-या राज्यात पळविले जात आहे. राज्याच्या तिजोरीचे दिवाळे निघत आहे आणि मुख्यमंत्री आता महाराष्ट्र थांबणार नाही, असे म्हणताहेत. यामुळे हे राज्य विकल्याशिवाय सरकार थांबणार नाही, असे वाटत आहे. हे सरकार बीड, परभणीच्या प्रकरणावर उत्तर द्यायला तयार नाही. एकीकडे संविधानावरून महाराष्ट्र पेटलेला असताना दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आग ओतण्याचा प्रयत्न करताहेत. सरकारच्या या असंवेदनशीलतेचा आम्ही निषेध करतो.
राहुल गांधींना बदनाम केले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचे काम केले आहे. आमचे नेते राहुल गांधी यांनी देशातील भय भीतीमुक्त भारत व्हावा यासाठी भारत जोडो यात्रा काढली होती. देशातील एकात्मतेसाठी कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास त्यांनी केला. परंतु, मुख्यमंत्र्यांनी भारत जोडो यात्रेसोबत माओवादी संघटना जुळलेल्या असल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनी देशात सुरू केलेल्या एका चांगल्या उपक्रमाला मुख्यमंत्र्यांनी गालबोट लावण्याचे काम केले आहे. याचा आम्ही निषेध व्यक्त करतो, असे नाना पटोले म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे भाषण ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’
राज्यात कुठल्याही समस्या नाहीत. दोन वर्षांत राज्य प्रगतीपथावर गेले आहे असे मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या भाषणात म्हणाले. पण, प्रत्यक्षात परिस्थिती या उलट आहे. मिळालेल्या बहुमताच्या आधारावर मुख्यमंत्री राज्यातील जनतेला मुंगेरीलाल के हसीन सपने दाखवित आहे अशी टीका शिवसेना उबाठाचे आमदार सुनील प्रभू विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.