छत्रपती संभाजीनगर : जटवाड्यातील ओव्हर गावात १६ वर्षीय पूजा शिवराज पवार या तरुणीने एका तरुणाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. रविवारी उघडकीस आलेल्या घटनेचा ग्रामस्थांसह विविध संघटनांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी ग्रामस्थांकडून गावाच्या मुख्य रस्त्यावर तीन तास ठिय्या देत संताप व्यक्त केला. तर आज देखील हर्सूल टी पॉईंट येथे तीन तास चक्काजाम आंदोलन करून ग्रामस्थांनी सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी दिली. यासाठी पोलिसांना सात दिवसांचा अल्टिमेटम देऊन आंदोलन मागे घेण्यात आले.
१८ ऑगस्ट रोजी पूजाने घरामागील विहिरीत उडी मारून आयुष्य संपवले. गावातीलच तरुण कासिम यासिन पठाण(२१) हा एकतर्फी प्रेमातून तिला छळत होता. सातत्याने कॉल, मेसेज करणे, ट्यूशनपर्यंत पाठलाग करणे, भेटण्यासाठी धमकावत होता. यात त्याच्या कुटुंबियांचा देखील सहभाग होता. त्याला कंटाळून पूजाने आत्महत्या केली. यात हर्सूल पोलिसांनी आत्तापर्यंत कासिमसह राजू यासिन पठाण व जब्बार गफ्फार पठाण यांना अटक केली आहे. तर उर्वरित यासीन सुभान पठाण, गफ्फार सुभान पठाण, इरफान हारुण पठाण, हारुण सुभान पठाण हे मात्र अद्यापही पसार आहेत.
पॉक्सोचे कलम का टाळले?
पूजाच्या आत्महत्येत बाललैंगिक अत्याचाराचे कलम लावावे, स्वतंत्र तपास पथक नेमून गांभीर्याने तपास करावा, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी ओव्हरगावच्या ग्रामस्थांनी मंगळवारी रास्ता रोको करून संताप व्यक्त केला. पूजाच्या कुटुंबियांचे अश्रू थांबत नव्हते. रविवारी आत्महत्येस जबाबदार ठरल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, तेव्हा बाललैंगिक अत्याचाराचे कलम लावण्याची विनंती करूनही पोलिसांनी टाळल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला.
आरोपींचे धमकीसत्र अद्यापही सुरू
ग्रामस्थांनी केलेल्या आरोपानुसार, पूजाच्या आत्महत्येनंतरही आरोपींच्या नातेवाइकांची घरासमोर येऊन धमक्या सुरू आहेत. आज अटक, कल बेल, असे म्हणत एक तरुण धमकी देत असल्याचा व्हीडीओ समोर आला. पोलिसांनी मात्र या व्हीडीओची पुष्टी केली नाही. यापूर्वी देखील जिन्सीतील तणावानंतर या गावात दोन गटात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी यावेळी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे.