धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील राजुरी येथील रहिवाशी असलेल्या व आंबेवाडी येथे आजोळी शिक्षणासाठी राहत असलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने रविवारी दि. २० ऑक्टोबर रोजी आंबेवाडी शिवारातील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
तीची आंबेवाडी येथील एक तरूण सतत छेड काढीत होता. या छेडछाडीला कंटाळलेल्या मुलीने आत्महत्या केली. श्रेया रामेश्वर इंगळे असे अल्पवयीन मुलीचे नाव असून ती दहावीच्या वर्गात शिकत होती. या प्रकरणी बेंबळी पोलिस ठाणे येथे दि. २४ ऑक्टोबर रोजी आंबेवाडी गावातील एका तरूणाच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच संबंधित तरूण फरार झाल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेया रामेश्वर इंगळे (वय १५ वर्षे) ही राजुरी ता. धाराशिव येथील राहणारी आहे. तीचे आंबेवाडी हे आजोळ आहे. शिक्षणासाठी ती आंबेवाडी येथे आजोळी रहात होती. ती यावर्षी दहावीच्या वर्गात होती. आंबेवाडी गावातील तरूण ओम गुणवंत कदम हा श्रेयाचा पाठलाग करून तीला वारंवार फोन करून त्रास देत होता. या त्रासाला कंटाळलेल्या श्रेया इंगळे हिने रविवारी दि. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आंबेवाडी शिवारातील कांताराम कुलकर्र्णी यांच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती बेंबळी पोलिसांना समजताच श्रेयाचा मृतदेह आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सहाय्याने विहिरीच्या बाहेर काढला. या प्रकरणी छाया पांडुरंग जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ओम गुणवंत कदम रा. आंबेवाडी याच्या विरोधात बेंबळी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.कलम-१०७, ७८(२) सह कलम १२ बाल लैंगिक अत्याचार अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.