21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसंपादकीय विशेषदिशाभूल करणारा निर्देशांक

दिशाभूल करणारा निर्देशांक

जागतिक पातळीवरून जाहीर केल्या जाणा-या काही अहवालांमध्ये जाणीवपूर्वक किंवा अपु-या माहितीमुळे भारताविषयीची चुकीची माहिती पसरवण्याचा उद्योग सध्या सुरू आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जागतिक भूक निर्देशांक. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंकासारखे देश या निर्देशांकाच्या क्रमवारीत भारतापेक्षा वरच्या स्थानी आहेत. विशेष म्हणजे हे देश भारतातील अन्नधान्यांवर अवलंबून आहेत. असे असताना भारतातील भूकबळींची स्थिती त्यांच्यापेक्षा अधिकच गंभीर असल्याचे दाखविले आहे. त्यामुळे या अहवालावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविकच आहे.

किस्तानातील अर्भक मृत्युदर हा हजारामागे ५५.८ आहे. एवढेच नाही तर तेथे बालमृत्युदर त्यापेक्षा अधिकच आहे. असे असतानाही भारताला भूक निर्देशांकात पाकिस्तानपेक्षा खाली दाखविले गेले आहे. यामागचे कारण म्हणजे या निर्देशांकासाठी वापरलेल्या अन्य निकषांत चुकीचे आकडे आहेत. काही त्रुटी आंतरराष्ट्रीय संस्थांच्या आकड्यातही आहे. जर्मनीच्या वेल्ट हंगरहिल्फे संस्थेने नुकताच ‘हंगर इंडेक्स’ जारी केला असून त्यानुसार जगभरातील देशांमधील उपासमारीची क्रमवारी घोषित करण्यात आली आहे. यात भारताला पुन्हा खालच्या म्हणजे १११ व्या स्थानावर दाखवण्यात आले आहे. या क्रमवारीत १२५ देश आहेत.

मागील वर्षी २०२२ मध्ये १२१ देशांच्या यादीत भारत १०७ व्या आणि २०२१ मध्ये ११६ देशांच्या यादीत १०१ स्थानावर होता. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंकासारखे देश भारतापेक्षा उच्च स्थानी आहेत. विशेष म्हणजे हे देश भारतातील अन्नधान्यांवर अवलंबून असताना भारतातील भूकबळींची स्थिती त्यांच्यापेक्षा अधिकच गंभीर असल्याचे दाखविले आहे. अशा वेळी या अहवालावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविकच आहे. हंगर इंडेक्सचे मोजण्याचे चार निकष आहेत. कुपोषण, मुलांची वाढ न होणे (स्टंटिंंग), मुलांचे वजन (उंचीच्या हिशेबाने कमी वजन) म्हणजेच वेस्टिंग आणि बालमृत्युदर (पाच वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांत) वेल्ट हंगरहिल्फेच्या मते, भारतात हे प्रमाण २८.७ आहे आणि ते गंभीर आहे. त्याचवेळी पाकिस्तानात २६.६ असून हा देश भारतापेक्षा वरच्या १०२ व्या स्थानावर आहे. बांगलादेश १९ गुणांसह ८१ व्या स्थानावर आणि श्रीलंका १३.३ गुणांसह ६० व्या स्थानावर आहे. या निर्देशांकासाठी निश्चित केलेले आकडे अणि पद्धत या दोन्हीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. भारत सरकारच नाही तर अनेक तज्ज्ञांनी देखील या अहवालाला नाकारले आहे.

निर्देशांकांतील मोठा भाग बालमृत्युदरावर आधारित आहे. २०२३ मध्ये भूक निर्देशांक तयार करताना २०२०-२१ चा आधार घेतला आणि भारतातला बालमृत्युदर हजारामागे ३१ आहे. भारताच्या सांख्यिकी प्रणालीकडून प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये बालमृत्युदर हा हजारी ३५ वरून ३२ हजारांवर पोचला होता. बालमृत्यूचे प्रमाण कमी होणा-या या दराला गृहित धरले तर २०२३ पर्यंत तो २४.४ पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. अशावेळी देशातील भूकबळी सांगण्यासाठी जुन्या आकडेवारीचा आधार घेण्याची आवश्यकता नाही. ताज्या आकडेवारीनुसार पाकिस्तानात अर्भक मृत्युदराचे प्रमाण हजारामागे ५५.८ आहे. बालमृत्यूचे प्रमाण तर त्यापेक्षाही अधिक आहे. असे असतानाही भारताला पाकिस्तानपेक्षा खालच्या पातळीवर दाखविण्यात आले आहे. यामागचे कारण म्हणजे भूक निर्देशांकात अन्य घटकांमध्ये देखील चुकीचीच आकडेवारी दाखविली आहे.

काही त्रुटी आंतरराष्ट्रीय संस्थांत देखील आहेत. भारत सरकारकडून जारी केलेल्या आकडेवारीनुसार अर्भक मृत्युदर २०२० मध्ये हजारामागे २८ दिसतो. आंतरराष्ट्रीय संस्था आपल्या जुन्या अंदाजाच्या आधारावर २९.८४८ आकडा सांगत आहेत. अर्थात कोणत्याही परकी किंवा भारतीय संस्थांना सरकारकडून जारी केलेल्या आकड्यांचा वापर करण्याची परवानगी असते. मात्र हंगर इंडेक्सचा अहवाल पाहिला तर त्यात सरकारने दिलेल्या आकड्यांचा समावेश असल्याचे दिसून येत नाही. कुपोषणाचे आकडे पाहिले तर वेल्ट हंगरहिल्फेकडे असणारा डेटा तथ्यात्मक वाटत नाही. कारण संबंधित एजन्सीने २०११ नंतर ग्राहक सर्वेक्षण केलेलेच नाही. त्यामुळे ३ हजार लोकांच्या नमुन्यांवर आधारित गॅलप सर्वेक्षण करत कुपोषणाचे आकडे तयार केले. खाद्यपदार्थांचे उत्पादन आणि उपलब्धतेचा विचार केल्यास १८८ देशांतील उपलब्ध नव्या जागतिक रँकिंग (२०२०) मध्ये भारताचे स्थान हे जगात ३५ व्या क्रमाकांवर आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून कुपोषणाची समस्या मार्गी लावण्यासाठी व्यापक प्रमाणात पोषण अभियान सुरू करण्यात आले आहे. पोषण ट्रॅकरमध्ये सात कोटींपेक्षा अधिक मुलांचा समावेश केला असून त्यानुसार वास्तविक आकड्यांच्या आधारावर निष्कर्ष जारी केले जात आहेत.

या आकडेवारीनुसार भारतातील मुलांत ७.२ टक्के ‘वेस्टिंग’ चे प्रमाण निश्चित झाले आहे. भूकबळीचा अहवालात (२०२३) लहान नमुन्याच्या आधारावर ‘एनएफएचएस’(२०१९-२१) मधील वेस्टिंगचा आकडा हा १८.७ टक्के निश्चित झाला. बुटकेपणाच्या मुद्यावर तज्ज्ञांच्या मते, संपूर्ण देशात एकाच प्रकारची उंची हे निकष राहू शकत नाही. बुटकेपणा किंवा सडपातळपणा देखील भौगोलिक क्षेत्र, पर्यावरण, अनुवांशिक आणि पोषणसारख्या गोष्टींवर अवलंबून आहे. पोषण ट्रॅकरनुसार देशात फेब्रुवारी २०२३ मध्ये केवळ ७.७ टक्के मुले कुपोषित असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी ३ हजार लोकांच्या गॅलप सर्वेक्षणाच्या आधारावर भारतात कुपोषणाचे प्रमाण १६.६ टक्के सांगितले जात आहे. वेल्ट हंगरहिल्फेच्या अहवालाच्या पद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तरीही संस्थेने भूकबळीचा निर्देशांक काढण्यासाठी वापरलेला फॉर्म्युला ग्रा धरला आणि त्यातील आकडेवारी आकलन करताना बालमृत्यूचा दर हा हजारी २४.४ असे म्हटले आणि पाच वर्षांच्या मुलांतील ‘वेस्टिंग’ला पोषण ट्रॅकरच्या मदतीने पाहिले आणि ७.२ टक्के गृहित धरले आणि ‘स्टटिंग’चे आकडे तौलनिक नसल्याने ते सोडून दिले तर त्यातून निघणारा भूकबळीचा निर्देशांक हा ९.५२ निघतो. यादृष्टीने ‘वेल्ट हंगरहिल्फे’च्या फॉर्म्युल्याच्या आधारावर भूकबळी निर्देशांक रँकिंग ही १११ वी नव्हे तर ४८ राहिली असती. अशावेळी चुकीच्या आकड्यांचा समावेश करत आणि चुकीची पद्धत वापरत भारताला सतत बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. भारताची प्रतिमा खराब करणा-या सर्व संस्थांविरुद्ध कडक कारवाई करायला हवी.

– प्रा. डॉ. अश्वनी महाजन, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, दिल्ली विद्यापीठ

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR