17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्रिपदासाठी महायुतीकडून नवे नाव पुढे येऊ शकते!

मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीकडून नवे नाव पुढे येऊ शकते!

विनोद तावडेंचे सूचक वक्तव्य

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवून माहायुतीचेच सरकार राज्यात सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त करताना, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये जो प्रयोग केला, तसा राज्यातही होऊ शकतो, ऐनवेळी वेगळेच नवीन नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येऊ शकते असे सूचक वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.

महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कोणाचेही नाव पुढे केले नसले तरी, ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री होईल, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असे जाहीर केले आहे. महायुतीने मात्र निवडणुकीनंतर ठरवू असे सांगून याबाबत संपूर्ण मौन बाळगले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना विनोद तावडे यांनी, महायुतीने सत्ता आली तर मुख्यमंत्रीपदासाठी ऐनवेळी वेगळेच नाव पुढे येऊ शकते असे सूचक वक्तव्य करून गोंधळ उडवून दिला.

महायुती ही विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व एकत्र बसून त्यावेळची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री कोण असेल, हे ठरवतील. मुख्यमंत्रिपदासाठी अचानकपणे इतरही काही नावे येऊ शकतात. सध्या त्याबाबत काही भाकीत करणे चुकीचे ठरेल. पण राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये जो प्रयोग केला, तसा राज्यातही होऊ शकतो. मात्र निकालात संख्या कशी येते, हे बघावे लागेल, असे तावडे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत महायुतीसाठी थोडे नकारात्मक वातावरण होते, आता मात्र तसे चित्र नाही. लोकसभा निवडणुकीत आमच्या मतांमध्ये फरक पडला. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काही जागा कमी आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या काही मतांमध्ये विभाजन झाले. पण विधानसभेत तशी परिस्थिती नाही.

विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी आणि प्रमुख बंडखोर यांच्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फुटणारच आहेत. त्याचाच फायदा महायुतीला विधानसभा निवडणुकीत होईल. त्याचबरोबर लाडकी बहीण योजना, शेतकरी वीज बिलमाफी यांसारख्या योजनांमुळे नागरिकांना थेट फायदा होत आहे. लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरेल, असा दावा तावडे यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR