अयोध्या : छोटी दिवाळी अर्थात नरक चतुर्दशीच्या निमित्ताने अयोध्येत दहावा दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्ताने सरयू नदीच्या ५६ घाटांवर ३० लाखांहून अधिक दिवे प्रज्ज्वलित केले जाणार आहेत. यावेळी महाआरती केली जाणार असून, २१०० ड्रोनच्या माध्यमातून आकाशात रामायणातील विविध प्रसंग साकारले जाणार आहेत.
छोटी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दीपोत्सवासाठी अयोध्या सज्ज झाली आहे. सरयू नदीच्या सर्व ५६ घाटांवर दिव्यांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. संपूर्ण अयोध्यानगरी रोषणाईने उजळून निघाली आहे. येथे 3ऊ स्क्रीनवर रामायणातील प्रमुख प्रसंग जिवंत करण्यात आले आहेत.
दीपोत्सव सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन अयोध्येत दाखल होणार आहेत. तसेच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही उपस्थिती असणार आहे.
अयोध्येत दीपोत्सवाचा नवा विक्रम होणार
रामनगरी अयोध्येत यंदाच्या दीपोत्सवात नवा विक्रम प्रस्थापित होणार आहे. राम की पैडी येथील ५६ घाटांवर ३० लाखांहून अधिक दिवे प्रज्ज्वलित केले जाणार आहेत. सरयू नदीच्या तीरावर २१०० बटुक महाआरती करणार आहेत. याशिवाय २१०० ड्रोनच्या मदतीने रामायणावर आधारित विशेष शो सादर केला जाणार आहे. आकर्षक रोषणाई आणि रामायणातील विविध प्रसंगांनी सजलेली प्रभू श्रीरामांची नगरी अयोध्या १० व्या दीपोत्सवाच्या भव्य आयोजनासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने अयोध्येची २० झोनमध्ये विभागणी
दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण अयोध्येची २० झोन आणि ५३ सेक्टरमध्ये विभागणी करण्यात आली आहे. तसेच पोलिस, सीआरपीएफ, पीएसी, बॉम्ब शोधक पथक आणि अग्निशमन विभागाच्या पथकांनाही सतर्क ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दीपोत्सवाचा सोहळा सुरक्षित वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
















