24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रतीर्थक्षेत्रस्थळी रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ!

तीर्थक्षेत्रस्थळी रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ!

पुणे : प्रतिनिधी
राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधून त्याच्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. या सुविधेमुळे तीर्थस्थळावरील वाहतूक कोंडी रोखण्यास मदत होऊ शकते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंबंधी माहिती देताना सांगितले की, तीर्थक्षेत्र आळंदी येथे आषाढी वारीसह वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविक येतात.

आलेल्या भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, यासाठी पुरेशा वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे. एसटी बसस्थानकांच्या इमारतीवर रॅम्पच्या सुविधेसह पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा. शिवाय या आराखड्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधेचाही समावेश करण्याच्या सूचना उपमुख्यमंर्त्यांनी दिल्या. तसेच बसस्थानक परिसरातील रस्त्यांसाठी एसटी महामंडळाची ६५२ चौरस मीटर जागा प्रस्तावित आहे. त्यासाठी एसटीला जागेच्या मोबदल्याची रक्कम जिल्हा नियोजन समितीमधून देऊन जागा नगरपालिकेला हस्तांतरित करावी, असेही त्यांनी सांगितले. पुण्याच्या आजूबाजूला असणा-या नगरपरिषद क्षेत्रातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.

यामुळे नागरिकांना सोयीसुविधा देण्यात नगरपरिषदांना मर्यादा येत आहेत. चाकण शहर व परिसराची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शहराची हद्दवाढ करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी दिलीप मोहिते पाटील यांनी केली. नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

हुतात्मा राजगुरू स्मारकाबाबत बोलताना पवार म्हणाले, राजगुरूनगर येथे हुतात्मा राजगुरू यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी २४८ कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना पोलिस वसाहतीसाठी आरक्षित जागेच्या ठिकाणी नगरपालिकेची प्रशासकीय इमारत करण्याचा सुधारित आराखडा तयार करून प्रस्ताव सादर करावा. त्याचप्रमाणे पंचायत समितीची जुनी जागा आहे, ती जागाही नगरपालिकेला हस्तांतरित करण्याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

मुख्य रस्ते बनविताना पर्यायी रस्ते दुरुस्त करा
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित येणा-या चाकण, राजगुरूनगर, आळंदी येथील एमआयडीसीमधून १० रस्ते जातात. यापैकी तीन रस्ते मंजूर आहेत तर चार रस्ते एमआयडीसी क्षेत्राबाहेरील असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळ-खेड भागातील नागरिकांनी औद्योगिक क्षेत्रासाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील गावांमधील नागरिकांना चांगल्या सोयी देण्यासाठी एमआयडीसी क्षेत्राला जोडणारे रस्ते, पोहोच रस्ते सुस्थितीत असणे आवश्यक असल्याचे म्हटले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR