धाराशिव : प्रतिनिधी
उमरगा शहरातून जाणा-या बायपास रस्त्यावर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या एका कार मधील प्रवशाला मारहाण करून त्याच्या जवळील रोख रक्कम १० हजार रूपये व दोन मोबाईल चोरून चोरटे पसार झाले. ही घटना ६ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाणे येथे ८ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिग्गी ता. उमरगा येथील ५२ वर्षीय संदीप मुरलीधर देशपांडे हे दि. ६ डिसेंबर रोजी उमरगा बायपास रस्त्यावर वॅगीनर गाडीतून जात होते. त्यांनी बायपास रस्त्यावर अत्तार पेट्रोल पंपाच्या पुढे नैसर्गिक विधीसाठी गाडी थांबविली होती. ते विधी उरकल्यानंतर पुन्हा गाडीत बसत असताना दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांचा गळा दाबून मारहाण केली. जिवे मारण्याचा प्रयत्न करुन त्यांचे कडील रोख रक्कम १० हजार रूपये व दोन मोबाईल फोन असा एकूण २५ हजार रूपये किंमतीचा माल व गाडीच्या चावीसह लटून पसार झाले. या प्रकरणी फिर्यादी संदीप देशपांडे यांनी दि. ८ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पोलीस ठाणे येथे कलम ३९४, ३४ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.