नवी दिल्ली : न्यायाधीशांच्या निवासस्थानाला लागलेली आग विझवण्यास गेलेल्या अग्मिशामक दलाच्या जवानांच्या हाती कोट्यवधींचे घबाड लागले आहे. हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आहे. न्यायाधीशांच्या घरी बेहिशेबी कोट्यवधींची रोकड आढळल्याने न्याय व्यवस्था हादरली आहे. सुप्रीम कोर्टाने या घटनेवर कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे.
न्यायाधीशांच्या घरी बक्कळ कॅश आढळल्याने सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली आहे. संबधीत न्यायाधीशांची दुसरीकडे उचलबांगडी करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी घरी नोटांचे ढीग आढळले आहेत. त्यांची बदली आता अलाहाबाद येथे करण्यात आल्याची माहिती आहे. यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी आग लागली तेव्हा ते बाहेर गावी होते.
आगीची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी पोलिस आणि अग्निशमक दलाला दिली. पोलिस त्यांच्या घरी आग आटोक्यात आणण्यासाठी आले तेव्हा त्यांना एका खोलीमध्ये कोट्यवधींची रक्कम दिसली, ही रक्कम बेकायदा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची चौकशी केंद्रीय गुन्हे शाखा (सीबीआय) आणि ईडी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या घटनेनंतर ही माहिती देशाचे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या कानावर घालण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर संजीव खन्ना यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत बैठक बोलावली. यशवंत वर्मा यांची लगेचच बदली करण्यात आली. त्यांना अलाहाबाद येथे पाठवण्यात आले आहे. न्यायाधीश वर्मा हे यांची येथून तीन वर्षापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयात बदली करण्यात आली होती. या गंभीर प्रकरणानंतर वर्मा यांची नुसती बदली करुन चालणार नाही, तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी वकीलांनी केली आहे. त्यांना राजीनामा देण्यास सांगितले असल्याचे समजते. त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांची विभागीय चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.