26.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रतिजोरीत खडखडाट, घोषणांचा गडगडाट

तिजोरीत खडखडाट, घोषणांचा गडगडाट

दानवेंनी केली अर्थसंकल्पावर टीका

मुंबई : राज्य सरकारने सादर केलेला अतिरिक्त अर्थसंकल्प हा राज्याला अधोगतीला नेणारा असून तुटीचा घोषणाबाज अर्थसंकल्प आहे. तिजोरीत खडखडाट असताना सरकारने घोषणांचा गडगडाट केला असल्याचा घणाघात करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पावर जोरदार हल्ला केला.

राज्याची आर्थिक परिस्थिती, उत्पन्न, तूट आणि तरतूद यात कोणताही मेळ दिसत नसून अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस आहे. सरकारने जनतेला केवळ गाजर दाखवल्याचा टोला दानवे यांनी लगावला. दानवे यांनी यावेळी सभागृहात राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या गणवेशाचे कापड सभागृहाला दाखवण्याचा प्रयत्न केला. कापड खरेदी करणारी एक एजन्सी, गणवेश कटींग करणारी दुसरी एजन्सी आणि प्रत्यक्षात कपडे शिवणारे महिला बचत गट असल्याकडे लक्ष वेधत सरकारला जाब विचारला. सरकारच्या या कारभारामुळे ऑक्टोबरपर्यंतही विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार नसल्याचा दावा केला.

ते म्हणाले, की राज्यावर सात लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज असताना २७ फेब्रुवारी रोजी सरकारने सहा लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद अंतरिम अर्थसंकल्पात केली होती, तर यंदा सहा लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद केलेला अर्थसंकल्प सादर केला. महसूल तूट २० हजार ५० कोटी रूपये आहे. राजकोषीय तूट ही एक लाख १० हजार ३५५ कोटी रुपये इतकी आहे. हे सरकार अल्पकालीन असल्याने त्यांनी अर्थसंकल्पातून घोषणांच्या थापा मारल्या आहेत, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.

सभापतींनी दानवेंना सुनावले
दानवे हे सभागृहात आज तीन दिवसांच्या निलंबनानंतर परतले. मात्र आल्याआल्याच त्यांचे कान उपटण्याची संधी सभापती डॉ. नीलम गो-हे यांनी साधली. त्यांना उद्देशून त्या म्हणाल्या, की दोनच दिवसांपूर्वी तुमच्यामुळे उद्धव ठाकरे यांना माफी मागावी लागली. तुमच्या राजकीय कारकिर्दीसाठी हे योग्य नाही. सभागृहात कोणतीही वस्तू सादर करायची असेल तर त्यासाठी सभापतींची परवानगी घ्यावी लागते. दानवे यांनी गणवेशाचे कापड सभागृहात दाखवून सत्ताधा-यांवर हल्ला केला. त्यावेळी उपस्थित मंत्री शंभुराजे देसाई यांनी त्यावर आक्षेप घेत सभापतींची परवानगी घेतली आहे का, असा सवाल दानवेंना केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR