25.2 C
Latur
Thursday, June 13, 2024
Homeमहाराष्ट्रतांदळाचा ट्रक कारवर उलटला; कार दबून ४ जखमी

तांदळाचा ट्रक कारवर उलटला; कार दबून ४ जखमी

अकोला : राज्यात रस्ते वाहतूक अपघाताचे प्रमाण गेल्या काही महिन्यांत वाढले असून वेगाने गाडी चालवणे किंवा ओव्हरटेक करण्याच्या नादात हे अपघात होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. नुकतेच अकोला जिल्ह्यातही भीषण अपघाताची घटना घडली आहे. कार आणि तांदूळ वाहून नेत असलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. एका चारचाकी कारची आणि ट्रकची धडक बसल्याचे दिसून येते. सुदैवाने अपघातात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. पण, कारमधील चारही प्रवासी जखमी झाले असून कार व ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे.

अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चान्नी फाट्यावरील एका नदीच्या पुलावरून दोन्ही वाहनं जात असताना, हा भीषण अपघात झाला. नदीवरील पूल छोटा असल्यामुळे ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक कारवर पलटी झाला. अरुंद रस्त्यावरुन ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातून ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि शेजारुन जात असलेल्या कारवर हा तांदळाच्या पोत्यांनी भरलेला ट्रक कोसळला.

या अपघातात ट्रक खाली कार दबल्या गेल्याने कारमधील प्रवासी वाहनात अडकले होते. मात्र, स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात कोणालाही मोठी दुखापत झाली नसून कारमधील ४ जण किरकोळ जखमी झाले आहेत. चान्नी फाट्यावरील अरुंद पुलावरच ट्रक कोसळल्याने ट्रकमधील तांदुळाचे पोते पुलाखाली पडले आहेत. तर, ट्रक शेजारुन जाणारी कार ट्रकच्या ओझ्याखाली दबल्याने तिचे मोठे नुकसान झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR