लातूर : प्रतिनिधी
समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधुन काढण्यासाठी दि. २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यातील १०० ग्रामीण भागात व शहरी भागातील झोपडपट्टी तसेच जोखीमग्रस्त लोकसंख्या असणा-या निवडक भागात ही शोध मोहीत राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत लातूर शहरातील निवडक विविध भागातील २८ हजार घरांना भेटी देवून १ लाख ५० हजार लोकसंख्येच्या भागात ही शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.
या शोध मोहिमेसाठी शहरात एकूण ७२ टीम गठीत करण्यात आल्या आहेत. प्रत्येक टीममध्ये एक आशा स्वंयसेविका व एक पूरुष स्वंयसेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मोहीमेच्या पर्यवेक्षणासाठी १५ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले असुन मनपाच्या ८ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांचे नियंत्रणाखाली सदरील शोध मोहीम त्या-त्या भागात राबविण्यात येणार आहे. पुरुष स्वंयसेवक म्हणुन न्यू व्हिजन नर्सिंग स्कूल, सोनी नर्सिंग स्कूल, वेदांत नर्सिंग स्कूल, जवळगे नर्सिंग स्कूल, स्वामी विवेकानंद नर्सिंग स्कूल या नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी नियुक्त करण्यात आलेले आहेत. या मोहीमेमध्ये घरावर मार्कींग देखील केले जाणार आहे. दि. २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत ‘कुष्ठरुग्ण शोध व सक्रीय क्षयरुग्ण शोध ’ मोहीमेअंतर्गत घरी येणा-या मनपाच्या आरोग्य पथकास आवश्यक माहिती देवून शारिरीक तपासणी करुन घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले.