22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरज्येष्ठ नागरिकाला रिक्षाचालक व साथीदारांनी लुटले

ज्येष्ठ नागरिकाला रिक्षाचालक व साथीदारांनी लुटले

सोलापूर : मोहोळमधील कुरूल रोडवरील गणेश नगरातील सुधाकर गणेश गायकवाड (वय ६७) बाळे ब्रीजजवळून सोलापूर बस स्थानकाकडे जाण्यासाठी रिक्षात बसले. त्यावेळी रिक्षाचालकासह त्याच्या अन्य दोन साथीदारांनी त्यांच्याकडील एक लाख सात हजार रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील संशयितांना काही तासांतच ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

फिर्यादी सुधाकर गायकवाड यांना मोहोळला जायचे होते. एसटी बसने ते मोहोळला जाणार असल्याने त्यांना सोलापूरच्या बस स्थानकाला यायचे होते. त्यासाठी ते बाळे ब्रीजजवळील मयूर कँटीनसमोरील रिक्षा स्टॉपजवळ थांबले. त्यावेळी एक रिक्षा त्या ठिकाणी आली आणि सुधाकर गायकवाड त्यात बसले. रिक्षात आधीच दोघेजण बसलेले होते.

रिक्षा चालकासह त्या दोघांनी सुधाकर गायकवाड यांना सोलापूर- तुळजापूर रोडवरील डी-मार्टसमोरील रस्त्यावर नेले. त्या ठिकाणी लोखंडी रॉड व फायटरचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यावेळी फिर्यादी गायकवाड यांच्याकडे दोन हजार रुपयेच मिळाले. रिक्षाचालक व त्या दोन संशयितांनी ती रक्कम घेतली. तरीदेखील त्यांनी मोबाईलमधील ‘फोन-पे’वरील एक लाख पाच हजार रुपये देखील काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलिस निरीक्षक शंकर धायगुडे तपास करीत आहेत.

फिर्यादीजवळील दोन हजार रुपयांची रोकड काढून घेतल्यानंतर रिक्षावाला व त्याच्या दोन साथीदारांनी सुधाकर गायकवाड यांच्या ‘फोन-पे’वरील रक्कम पाहिली. त्यावेळी त्यात एक लाख पाच हजार रुपये होते. त्यानंतर रिक्षावाल्याने कोंडी येथील भारत पेट्रोलियम येथे रिक्षा नेली. त्या ठिकाणी वेगवेगळे क्यूआर कोड स्कॅन करून पैसे जबरदस्तीने काढून घेतले, असेही फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी खबऱ्यांकडील माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या गुन्ह्यांचा तपास सुरू केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR