मुंबई : महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचे काम या सरकारकडून होत आहे. हे आता सिद्ध झाले आहे. हे तीनही मंडळी आता स्पेशल निधी पक्षफोडीसाठी ठेवतील. पक्ष फोडण्यासाठी ठोस तरतूद असेल. यांनी सर्व तरतुदी केल्या. महाराष्ट्र उधळ्याचा विडा उचलला असेल तर यासारखा दुर्दैवी बजेट दुसरा कोणता असू शकत नाही अशी टीका विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली.
दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या २०२४ -२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. आम्ही हे करणार आहोत, ते करणार आहोत. याच्या पलीकडे महाराष्ट्राच्या या बजेटमध्ये काहीही दिसलं नाही. महिला सक्षमीकरणाचा उल्लेख केला. परंतू त्यात ठोस असं काहीही दिसले नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.
शेतकरी, शिक्षण, शेतमजूर, बेरोजगार, महिलांवरचे अत्याच्यार वाढत आहेत. मात्र यासाठी काहीही केलं नाही. शेतक-यांसाठी ठोस तरतूद नाही. केवळ सत्ताधा-यांनी स्वत:ची पाट थोपटून घेण्यासाठी फक्त स्मारक अन् स्मारकासाठी निधी हेच त्यांचा उद्देश आहे. यातून मते मिळवणे, हेच सरकारने केल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
वडेट्टीवार म्हणाले, राज्य कर्जबाजारी झाले आहे. कर्ज काढून घर चालवल्या जात आहे, मिळकतीच्या भरवश्यावर नाही. आम्ही राज्य उभं केलं. मात्र पुन्हा त्या राज्याला खड्ड्यात घालण्याचं काम सुरु आहे. ही तूट भरून काढण्यासाठी लोकांना महागाईला सामोरे जावे लागेल अन् सरकार विकासाचं गाजर दाखवणार. निवडणूक झाली की लोकांची लूट सुरु होईल.