28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रभिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग

भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग

भिवंडी : भिवंडीत आगीचे सत्र सुरूच असून, पुन्हा अग्नितांडव पाहायला मिळाले. भिवंडी तालुक्यातील राहणाळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोविंद कंपाऊंड येथे केमिकल गोदामाला भीषण आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. या आगीत केमिकल साठवून ठेवलेल्या दोन गोदामांसह चप्पलचे गोदाम असे तिन्ही गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत.

भिवंडी शहर व ग्रामीण भागात दिवसाआड लहान- मोठ्या आगीच्या दुर्घटना घडतच आहेत. त्यातच आज दुपारच्या सुमारास राहणाळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोविंद कंपाऊंडमधील एका गोदामात ठेवण्यात आलेल्या केमिकलला अचानक आग लागल्याने या आगीमुळे लगतच्या केमिकल गोदामात साठवून ठेवलेल्या केमिकलने क्षणातच मोठा पेट घेऊन दोन्ही गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. तर केमिकल गोदामालगत असलेल्या एक चप्पलचे गोदामही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन अधिका-याकडून सांगण्यात आले.

अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल
सध्या भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले असून नागरिकांच्या डोळ्यांमध्ये जळजळ होत असल्याचे दिसून येत आहे. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR