मुंबई : प्रतिनिधी
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महायुतीसह महाविकास आघाडी जोरदार तयारी करत आहे. दरम्यान, निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून राजकारण रंगले आहे. ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात येत आहे. खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या याबाबत वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्रिपदाच्या चेह-याशिवाय निवडणूक लढता येणार नाही असे देखील ते म्हणाले आहेत. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेले काँग्रेस व शरद पवार गट नाराजी व्यक्त करत आहेत.
अ ब क मुख्यमंत्री यामध्ये स्वारस्य घेऊ नये : जयंत पाटील
महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्याने जयंत पाटील मुख्यमंत्री किंवा अ ब क मुख्यमंत्री यामध्ये स्वारस्य घेऊ नये. आपण सत्तेवर आले पाहिजे हे स्वारस्य पाहिले पाहिजे. कोण मुख्यमंत्री हे निवडून आल्यानंतर नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते ठरवतील. असे मत शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
बैठकीनंतरचा फॉर्म्युला अंतिम : वडेट्टीवार
वैयक्तिक मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र मुख्यमंत्रिपदाबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल तो फॉर्म्युला अंतिम असणार आहे. बैठकीमध्ये चर्चा झाल्यावरच महाविकास आघाडी ठरवेल, असे स्पष्ट मत काँग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.
पदासाठी नाही तर विचारासाठी लढत
महाविकास आघाडीची बैठक होईल. शरद पवार हे उद्धव ठाकरे व काँग्रेसशी चर्चा करतील. तेव्हा निर्णय घेतला जाईल. मात्र ही लढाई मुख्यमंत्रिपदाची नाही. तर ही लढाई स्वाभिमानाची असून सामान्य लोकांच्या हिताचे सरकार या महाराष्ट्रामध्ये आणण्याची तयारी आहे. पदासाठी लढत करण्यापेक्षा विचारासाठी लढत करणे गरजेचे असून भाजपला हद्दपार करण्याची ख-या अर्थाने गरज आहे, असे स्पष्ट मत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.