23.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रकेवळ आश्वासनांच्या रेवड्या देणारे राज्य सरकार

केवळ आश्वासनांच्या रेवड्या देणारे राज्य सरकार

ठाकरेंचे सत्ताधा-यांवर टीकेचे बाण

नागपूर : राज्यातील सरकार हे केंद्राप्रमाणे केवळ आश्वासनांच्या रेवड्या देणारे सरकार आहे. मी जर मुख्यमंत्री असतो तर सरकारी कर्मचा-यांना जुन्या पेन्शनसाठी आंदोलन करावे लागले नसते. पाच दिवसांचा आठवडा हा निर्णय मी घेतला. सरकारी कर्मचा-यांचे योगदान मला माहिती आहे. या सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही. त्यामुळे या सरकारला आता पेन्शन नव्हे टेन्शन देण्याची गरज आहे, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरातील यशवंत मैदानात सुरू असलेल्या जुन्या पेन्शन आंदोलनाला भेट दिली.

उद्धव ठाकरे यांनी जुन्या पेन्शनसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देऊन राज्य सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी आदित्य ठाकरे , भास्कर जाधव यांच्यासह ठाकरे गटाचे आमदारही उपस्थित होते.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचे सरकार पेन्शन योजनेबद्दल निर्णय घेणार होते, तेवढ्यात आमचे सरकार पडले. माझे सरकार पडले नसते तर तुम्हाला आज मोर्चा काढावा लागला नसता. आम्ही धोरण बनवतो, तुम्ही अमलात आणता. हे अवैध सरकार आहे. तुम्ही तुमच्या हक्काचे मागत आहात. निवडणूक येत आहे, पुन्हा तुम्हाला फसवले जाईल, जसे २०१४ मध्ये फसवले होते, १५ लाख आले का?

तुम्ही शासनात काम करता. तुम्हाला सर्व सत्य माहीत आहे. आता शिवसेना तुमच्यासोबत आली आहे, शक्ती वाढते आहे. आता आपल्यात राज्यातील नव्हे तर केंद्रातही सरकार बदलण्याची शक्ती आहे. काल तुमच्या नेत्यांसोबत चर्चा झाली आहे. माझी शिवसेना आणि माझे शिवसैनिक तुमच्यासोबत आहेत. आज स्वागत करू नका, जेव्हा आपले सरकार येईल आणि जुनी पेन्शन लागू होईल, तेव्हा स्वागत करू. लढाई थांबवू नका. कोणाच्या फसव्या घोषणेला बळी पडू नका, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

२०२४ मध्ये आमचे सरकार येणार : आदित्य ठाकरे
यावेळी आंदोलकांनी आदित्य ठाकरे यांनाही बोलण्याची विनंती केली. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, २०२४ साली आमचे सरकार येणार, आम्ही जुनी पेन्शन लागू करणार, एकच मिशन जुनी पेन्शन, अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR