लातूर : शहरातील कापड गल्लीत असलेल्या एका तीन मजली दुकानाला आग लागली आहे. अरुंद गल्लीबोळामुळे या ठिकाणी अग्निशमन दलाच्या पथकाला पोहोचताना अनंत अडचणी येत होत्या. या आगीत कापड दुकानातील सर्व माल जळून खाक झाला आहे. आग लागलेल्या ठिकाणी बघ्यांची गर्दी वाढल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये अडचण येत आहे.
लातूर शहरातील गंजगोलाई भागात सोळा मुख्य रस्ते आणि अनेक लहान मोठ्या रस्त्यांचं जाळ आहे. या प्रत्येक रस्त्यावर विविध प्रकारची दुकानं आहेत. यातच कापड गल्ली भागातील पूनम मॅचिंग क्लाथ सेंटरला आज रात्री आठच्या सुमारास अचानक आग लागली. तीन मजली दुकानाच्या वरच्या मजल्यावरून आगीला सुरुवात झाली होती. आग लागल्यानंतर या भागाचा वीज पुरवठा बंद करण्यात आला. यावेळी दुकानातील सर्व कर्मचारी बाहेर आले. सुदैवाने कसल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही. मात्र या आगीत मोठ्या प्रमाणामध्ये दुकानातील माल जळून खाक झाला आहे.
आगीच्या घटनेची माहिती कळताच गांधी चौक पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी आल्या होत्या. मात्र अरुंद गल्ली असल्याकारणाने अग्निशमन दलाच्या गाडीस गल्लीत प्रवेश करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या