मुंबई (प्रतिनिधी) : भाजपाच्या आग्रहापुढे नमते घेऊन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ सोडावा लागला तरी संभाजीनगर मात्र आपल्या शिवसेनेसाठी मिळवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी झाले आहेत. शिंदे सेनेने संभाजीनगरमधून रोजगार हमीमंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली असून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे व एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्यात तिरंगी सामना होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदानही झाले तरी महायुतीतील जागावाटपाचा घोळ अजूनही संपलेला नाही. संभाजीनगरच्या जागेसाठी भाजपाने प्रचंड आग्रह धरला होता तर एकनाथ शिंदे यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली होती. दुसरीकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग साठीही रस्सीखेच सुरू होती. अखेर या दोन जागांबाबत तुम्ही एक आम्ही एक असा मार्ग काढून हा तिढा सोडवण्यात युतीच्या नेत्यांनी यश आले आहे.
संभाजीनगरसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपुढे राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादनमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे तसेच मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणारे आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांच्या नावाचे पर्याय होते. अखेर संदीपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. महाविकास आघाडीत औरंगाबादची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळाली असून ठाकरे गटाने या मतदारसंघातून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे विरुद्ध एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनेदेखील उमेदवार उभा केला आहे.