लंडन : युरो करंडक फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठलेल्या गतउपविजेत्या इंग्लंडची प्रतिष्ठा पणास लागलेली आहे. आठ संघांच्या फेरीत त्यांना फॉर्ममध्ये असलेल्या धोकादायक स्वित्झर्लंडच्या कडव्या आव्हानास सामोरे जावे लागेल.
पुढील लढतीत गॅरेथ साऊथगेट यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला कामगिरी उंचवावी लागेल. मागील लढतीत गतविजेत्या इटलीस २-० फरकाने पराभूत करताना मुराट याकिन यांच्या मार्गदर्शनाखालील स्विस संघाने उल्लेखनीय चमक दाखविली होती. राऊंड ऑफ १६ फेरीत इंग्लंडचा संघ पराभवाच्या खाईत असताना स्लोव्हाकियाविरुद्ध भरपाई वेळेतील पाचव्या मिनिटास ज्युड बेलिंगहॅम याने बरोबरीचा गोल केला आणि नंतर अतिरिक्त वेळेतील पहिल्याच मिनिटास कर्णधार हॅरी केन याने केलेल्या गोलमुळे इंग्लंडने २-१ विजयासह आगेकूच राखली.
जर्मनीत सुरू असलेल्या युरो करंडकात इंग्लंडला अपेक्षेनुसार कामगिरी बजावता आलेली नाही, त्यामुळे संघाचे मुख्य प्रशिक्षक साऊथगेट यांच्यावर टीकाही झाली आहे. दुसरीकडे स्वित्झर्लंडने स्पर्धेत सातत्य राखलेले आहे. अ गटातील अखेरच्या लढतीत भरपाई वेळेतील गोलमुळे जर्मनीने त्यांना बरोबरीत रोखले होते. त्यामुळे स्विस संघाचे गटविजेतेपद हुकले. नियमित बचावपटू मार्क गेही शनिवारची लढत निलंबनामुळे खेळू शकणार नाही, त्यामुळे इंग्लंडची बचावफळी कमजोर संभवते. शिवाय जॉन स्टोन्सने पायावरील बँडेजसह सराव केला, तर दुखापतीनंतर यावर्षी फेब्रुवारीनंतर ल्युक शॉ खेळलेला नाही, त्यामुळे इंग्लंडची बचावफळी दडपणाखाली आहे. स्वित्झर्लंडचा अनुभवी मध्यरक्षक ग्रानिट झाका याने मध्यफळीत शानदार कामगिरी प्रदर्शित केलेली आहे.
अजून विजेतेपदाची प्रतीक्षा
इंग्लंड अकराव्यांदा युरो करंडकात खेळत आहे, अजूनही त्यांना विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. गतवेळी त्यांना अंतिम लढतीत इटलीने पेनल्टी शूटआऊटमध्ये हरविले होते. स्वित्झर्लंडने स्पर्धेच्या इतिहासात अजून उपांत्य फेरी गाठलेली नाही. तीन वर्षांपूर्वी त्यांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. दोन्ही संघ शनिवारी विजयासाठी प्रयत्नशील असतील. या लढतीतील जिंकणारा संघ तुर्कस्तान व नेदरलँड्स यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध उपांत्य फेरीत खेळेल.