24.3 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeमहाराष्ट्रविरोधी पक्षनेतेपदावरून मविआत रस्सीखेच?

विरोधी पक्षनेतेपदावरून मविआत रस्सीखेच?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. तीनही पक्षांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. त्यानंतर आता विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून या पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मविआमधील तीनही पक्षांनी २८८ पैकी फक्त ४६ जागा जिंकल्या. विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणारे १० टक्क्यांचे संख्याबळ एकाही पक्षाकडे सध्या नाही. शिवसेना (ठाकरे) पक्षाला २०, काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला फक्त १० जागा जिंकता आल्या.

विरोधी पक्षनेतेपदासाठी २८८ पैकी १० टक्के म्हणजे २९ जागा असण्याची आवश्यकता आहे. मात्र पुरेसे संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षनेतेपद दिले जाईल, अशी चर्चा असताना आता तीनही पक्षांची हे पद मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू आहे.
मिळालेल्या बातमीनुसार, त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद आणि उपाध्यक्षपद मागितले आहे. याचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, विरोधी पक्षनेतेपदाचा चेहरा कोण असणार, यावर अद्याप मविआच्या घटक पक्षांची चर्चा झालेली नाही. नाना पटोले यांनी याआधी अध्यक्षपद आणि विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविल्यामुळे त्यांच्या नावाचा या पदासाठी पुन्हा विचार होण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेने (ठाकरे) भास्कर जाधव यांना पक्षाचा गटनेता तर सुनील प्रभू यांना मुख्य प्रतोद म्हणून नेमले आहे.

विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा आरोप करत मविआच्या आमदारांनी विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी आमदारकीची शपथ घेण्यास नकार दिला. मात्र अधिवेशनाच्या दुस-या दिवशी या आमदारांनी शपथ घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR