गत तीन वर्षांत चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. तेलंगणा राष्ट्र समिती राष्ट्रीय पातळीवर नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत होती. नंतर केसीआर यांनी महाराष्ट्रातील माजी आमदार, खासदार आणि जि. प. सदस्यांना पक्षात घेत पक्षाचे नाव भारत राष्ट्र समिती (बीआरएस) असे ठेवले. इतर राज्यांत लक्ष घालताना आपल्या पक्षाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांचा स्वत:च्याच राज्यात पराभव झाला. केसीआर सरकारतर्फे रयतु बंधू योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना ४ हजार रुपये देण्यात येत होते परंतु त्याचा लाभ सधन आणि बड्या शेतक-यांनीच घेतला. या योजनेचा लाभ अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर यांना मिळाला नाही. त्यामुळे या शेतक-यांची केसीआर सरकारवर खफामर्जी झाली. केसीआर यांच्या पराभवाची कारणमीमांसा करताना असे सांगितले जाते की, त्यांच्या सरकारच्या विविध योजनांची प्रसिद्धीच अधिक झाली.
या योजनांचा सामान्य नागरिकांना लाभ मिळाला नाही. म्हणजे नुसती जाहिरातबाजी करून चालत नाही हेच यातून सिद्ध होते. ‘रयतु बंधू’, ‘दलित बंधू’ या योजनांची केसीआर यांनी जाहिरातच अधिक केली. शेतक-यांना या योजनांचा लाभ मिळत नव्हता म्हणून त्यांच्यात नाराजी दिसत होती. शेतक-यांचा तांदूळ खरेदी करण्याचे आश्वासन राव यांनी दिले होते, प्रत्यक्षात खरेदी झालीच नाही. त्यामुळे शेतकरी नाराज होते. सरकारबद्दल सर्वत्र नाराजीचा सूर होता. सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होता. त्याचा सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास झाला. राव यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा राज्यकारभारावर प्रभाव वाढला होता. राव यांचा मुलगा मंत्री, भाचा मंत्री, मुलगी आमदार आणि अन्य नातेवाईकही महत्त्वाच्या पदावर असे चित्र होते. मंत्र्यांना काहीही अधिकार नव्हते आणि स्वातंत्र्यही नव्हते. सरकारमध्ये भ्रष्टाचार, घराणेशाही, खोटी आश्वासने यामुळे जनतेत मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. या नाराजीचा फायदा काँग्रेसला झाला. स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती काँग्रेस पक्षामुळे झाली होती. अखेर त्याचे श्रेय काँग्रेसला मिळाले. ‘दलित बंधू’ योजनेच्या माध्यमातून दलित समाजाला व्यवसाय सुरू करण्यासाठी १० लाख रुपये देण्याची योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यात आली नाही.
या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जात होते. त्यामुळे या योजनेतील भ्रष्टाचार आणि लाचखोरीचा मुद्दा विरोधी पक्षांनी प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवला. हैदराबाद वगळता इतर शहरांत आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या असलेल्या कमी संधी आणि तेलंगणा राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या पेपरफुटीचा आणि त्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा निवडणूक प्रचारात ऐरणीवर आला. त्याचाही फटका केसीआर सरकारला बसला. तेलंगणात रेड्डी आणि दलित असा वाद झाला तेव्हा दलित समाजाकडे दुर्लक्ष केल्याचा फटकाही राव सरकारला बसला. तसेच मद्य घोटाळ्यात केसीआर यांची मुलगी के. कविता हिच्यावर अटकेची कारवाई करण्यात भाजपने बोटचेपी भूमिका घेतली. त्यामुळे तेलंगणात बीआरएस आणि भाजप आतून एकच असल्याचा समज तयार झाला, त्याचाही फटका राव सरकारला बसला. दरम्यान काँग्रेसने केसीआर यांची साथ सोडून आलेल्या रेवंत रेड्डींना मोठे बळ दिले. ‘भारत जोडो’ यात्रा तेलंगणातून जात असताना बीआरएसच्या विरोधात वातावरण तयार झाले. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी रेवंत रेड्डी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम नव्हता.
राहुल गांधींच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी रेवंत रेड्डी यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आणि केसीआर सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. सरकारची धोरणं, भ्रष्टाचार, शेतक-यांसाठी आणि दलितांसाठी असलेल्या योजना कशा फोल आहेत, कालीश्वरम प्रकल्पाचा शेतक-यांना अजूनही फायदा झालेला नाही तसेच महागाई, बेरोजगारी आणि पेपरफुटी आदींचा रेवंत यांनी सरकारविरोधात खुबीने वापर केला. केवळ सरकारच्या धोरणावर टीका करून निवडणूक जिंकता येत नसते तर आपण काय करणार हेही सांगावे लागते. आपण काय करणार हेही रेवंत रेड्डी सांगत राहिले. सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या केसीआर सरकारविरोधात वातावरण निर्माण करण्यात रेवंत रेड्डी यशस्वी झाले. काँग्रेसने प्रचारात राव सरकारच्या गैरकारभारावर नेमके बोट ठेवले. सरकार सर्व आघाड्यांवर कसे अपयशी ठरले ते जनतेला दाखवून दिले. काँग्रेसने दिलेली पाच आश्वासने लोकांच्या पसंतीस उतरली. कर्नाटकात काँग्रेसने दिलेल्या पाच आश्वासनांची मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत अंमलबजावणी केली होती. त्याची आठवण पक्षाने मतदारांना करून दिली होती.
त्यामुळे लोकांमध्ये काँग्रेसबद्दल विश्वासाची भावना निर्माण झाली. त्याचीच परिणती राव सरकारचे साम्राज्य लयास जाण्यात झाली. कोणताही पराभव आणि विजय हा अंतिम नसतो. त्यामुळे तीन राज्यांत पराभव झाला म्हणून काँग्रेसने हातपाय गाळण्याची गरज नाही. तेलंगणातील विजयामुळे त्यांना ऑक्सिजन मिळाले आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने सत्ता घालवली ती गाफिलपणामुळे. राजकारणात गाफील राहून चालत नाही, सतत सावध रहावे लागते. कर्नाटकात विजय मिळाला म्हणजे अन्य राज्यातही सहज मिळेल असे नाही. मिळालेली सत्ता टिकवून ठेवण्याचे सामर्थ्य सत्ताधा-यांमध्ये असले पाहिजे. विरोधी पक्ष प्रबळ असेल तर सत्ताधारी निष्प्रभ होतात हा धडा लक्षात ठेवायला हवा. अंतर्गत वाद, फाजील आत्मविश्वास टाळायला हवा. तेलंगणामधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अनुमूल रेवंत रेड्डी यांची काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. ते आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.