लातूर : प्रतिनिधी
नवरात्र महोत्सव समिती, ग्रामपंचायत, सेवा सोसायटी, तंटामुक्त ग्राम समिती व ग्रामस्थ बाभळगाव यांच्या वतीने ३ ते १२ ऑक्टोबरदरम्यान बाभळगाव येथील श्री व्यंकटराव देशमुख महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्वामी श्री भुवनेश्वर वसिष्ठजी महाराज यांच्या रामलिला कथेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते रामलिला कथेचे उद्घाटन झाले. पहिल्याच दिवशी रामलिलेतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले.
श्री भुवनेश्वर वसिष्ठजी महाराज यांनी आपल्या ३० कलावंतांसह रामलीला सादर केली. गुरुवारच्या पहिल्या दिवशी गणेश वंदन, राम-सीता पूजन, हनुमान पूजन आणि आरती झाल्यानंतर रामलीला कथेत पहिला प्रसंग नारदमुनी प्रवेशाचा होता. नारदमुनींनी हिमालयात तपस्या सुरु केली. त्यांच्या तपस्येने इंद्रदेवाचे सिंहासन हलले. त्यामुळे देवनगरीत इंद्रदेव चकीत झाले. अष्टधातूंनी बनविलेले बलाढ्य सिंहासन हलविण्याची शक्ती कोणाकडे आहे. या विचाराने इंद्रदेव संतापले. त्यानंतर त्यांनी शोध सुरु केला. त्यासाठी इंद्रदेवाने कालदेवाला कामाला लावले. कालदेवाने पृथ्वीतलावर येऊन त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा हिमालयाच्या गुफांमध्ये नारदमुनी तपस्या करीत असल्याचे कालदेवाला दिसून आले.
कालदेवाने ही सर्व हकीकत इंद्रदेवाला सांगितली. तेव्हा इंद्रदेव क्रोधीत झाले. नारदमुनींची तपस्या भंग नाही झाली तर सिंहासन भंगून जाईल, या विचाराने इंद्रदेवाचा पारा चढला. त्यांनी नारदमुनींची तपस्या भंग करण्यासाठी त्यांचे मित्रवर्य कामदेव यांना पाचारण केले. कामदेवाने कालदेवास सोबत घेऊन पृथ्वी तलावर प्रवेश केला आणि नारदमुनींची तपस्या भंग करण्यासाठी रंभा, उर्वशी, मेनका यांना पाचारण केले. परंतु तपस्या भंग होण्याऐवजी अप्सरांनाच हार मानावी लागली. शेवटी कामदेवाने नारदमुनींची तपस्या भंग केली. महाकाव्य रामायणातील एक-एक प्रसंग पुढे सरकत गेला. ते पाहताना आणि ऐकताना उपस्थित ग्रामस्थ भारतीय संस्कृतीच्या दर्शनाचे धन्य झाले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, ट्वेन्टी वन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, सरपंच प्रिया सचिन मस्के, उपसरपंच गोविंद देशमुख, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन महादेव गंगाराम जटाळ, व्हाईस चेअरमन शिवाजी आप्पाराव जाधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवराज नागोराव देशमुख, श्याम देशमुख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचा शुभ संदेश
बाभळगावात रामलिला कथेस सुरुवात झाली. दरम्यान, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी रामलीला कथेस शुभ संदेश पाठवला. तो संदेश माणिक सगर यांनी वाचला. भारतीय महाकाव्यांतील रामायण हे प्रसिद्ध ऋषी वाल्मिकी यांनी लिहिलेले आहे. कथेच्या आयोजनातून रामलीला कथेचे विविध भारतीय मूल्य नव्या पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे, असे शुभ संदेशात नमूद केले होते.