कल्याण : अनधिकृत बांधकाम करणा-यांना, कागदपत्रे बनवून लोकांची फसवणूक करणा-यांना संरक्षण देणा-यांना ठाण्यातून अभय आहे. गँग्स ऑफ डोंबिवलीचा आका, म्होरक्या ठाण्यात आहे. विद्यमान पालकमंत्री आहात. तर मुलगा या मतदारसंघात खासदार आहे. तुम्हाला सेलिब्रिटींच्या घरी जाण्यास वेळ आहे. गंगेत डुबकी मारून पुण्य मिळवण्यापेक्षा या ६५ इमारतीतील रहिवाशांना एकदा भेटा जास्त पुण्य मिळेल; असा टोला मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला आहे.
कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत ६५ अनधिकृत इमारतींच्या मुद्द्यावरून मनसेचे नेते व माजी आमदार राजू पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर नाव न घेता निशाना साधला आहे. तसेच यात ही खूप मोठी चैन आहे. काही लोक केवळ आमदार दिसतात. पण त्यांची भूमिका हस्तकांसारखी आहे; असे सांगत शिंदे गटाचे स्थानिक आमदार राजेश मोरे यांना लक्ष केले.
अनधिकृत बांधकामांमध्ये राहणा-या रहिवाशांसाठी मनसे उभी असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले कि या रहिवाशांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी आम्ही आर्थिक मदत करू. मात्र शासनाने त्यांना दिलासा द्यावा. आम्ही लवकरच मंत्री गणेश नाईक यांची भेट घेणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही न्यायाची अपेक्षा आहे. तर दिव्यातील बेकायदा इमारतीत ठाणे महापालिकेचा जोशी नावाचा अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाचे पाच नगरसेवक पार्टनर आहेत. बेकायदा इमारतीच्या एका स्लॅब मागे तीन लाख रुपये घेतले जात असल्याचा गंभीर आरोप मनसे नेते राजू पाटील यांनी केला.