मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ठरलेल्या राज्यातील तब्बल ८ लाख महिलांना आता १५०० रुपयांऐवजी दर महिन्याला केवळ ५०० रुपयांचा हफ्ता मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. या ८ लाख महिलांना नमो शेतकरी महासन्मान निधी मिळत असल्याने त्यांना १५०० रुपयांऐवजी केवळ ५०० रुपये मिळणार आहेत. राज्य सरकारने केलेल्या छाननीत ८ लाख लाडक्या बहिणींना नमो शेतकरी महासन्मान निधीची मदत मिळत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे १ हजार रुपयांची कपात करण्यात येणार आहे. मे महिन्यापासूनच या हप्त्यात कपात होणार आहे.
दरम्यान, यावर राज्यातील ८ लाख महिलांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत १००० रुपये मिळत असल्याने त्यांना मिळणारा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा १५०० रुपयांचा मासिक हप्ता कमी करून फक्त ५०० रुपये देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अन्यायकारक नाही का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केला आहे. निवडणुकीपूर्वी २१०० रुपयांचा हप्ता देऊ, अशी वल्गना करणारे महायुती सरकार आज २१०० रुपये तर सोडाच, पण मासिक १५०० रुपयेही वेळेवर देत नाही. याउलट ते अजून कसे कमी होतील, यासाठी नवनव्या क्लृप्त्या शोधत आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची ही घोर फसवणूक असल्याचे ट्वीटमध्ये म्हटले आहे.
नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना अशा दोन्ही योजनांचा लाभ घेणा-या ८ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे ५०० रुपयेच मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. आर्थिक सक्षम असलेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्यानं त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून पैसेही वसूल करण्यात आल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. याबाबत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी कोणत्याही महिलांवर गुन्हा दाखल केला नसून, वसुली केलेली नाही, निष्कारण भ्रम पसरवला जात असल्याचे म्हटले.
आधी सरसकट लाभ, आता निकष लावले
विधानसभा निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना सुरु झाली तेव्हा महिलांना सरसकट लाभ देण्यात आला. यात पात्र, अपात्र अशा दोन्ही प्रकारच्या महिलांनी अर्ज केले. पण विधानसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळणा-या महिलांची कागदपत्र पडताळणी केली. यातून अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेच्या लाभातून वगळले.
लाडक्या बहिणींच्या संख्येत दरमहा घट!
ऑक्टोबरमध्ये या योजनेसाठी २.६३ कोटी अर्ज आले होते. तपासणी प्रक्रियेनंतर ही संख्या ११ लाखांनी कमी झाली. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत २.५२ कोटी महिला लाभार्थ्यांना योजनेचे पैसे मिळाले. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये ही संख्या २.४६ लाखावर आली. यातूनही आता नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणा-यांना १५०० रुपयाऐवजी फक्त १ हजार रुपये मिळणार आहेत.
म्हणून महिलांना ५०० रुपयांची मदत
इतर शासकीय योजनांचा १५०० रुपयांपेक्षा कमी लाभ घेणा-या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे. त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा १००० रुपये लाभ घेत असलेल्या ७,७४,१४८ महिलांना उर्वरित फरकाचे ५०० रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे, असे स्पष्टीकरण मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.