छ. संभाजीनगर : शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, डेटिंग अॅपवर ओळख झालेल्या शासकीय ठेकेदाराने पतीपासून विभक्त झालेल्या २६ वर्षीय महिलेवर ऑफिसमध्येच बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. सिडको भागातील भोज हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका ऑफिसमध्ये हा सर्व प्रकार घडला. विशेष म्हणजे यावेळी ठेकेदाराने संबंधित महिलेचे अश्लील व्हीडीओ-फोटो काढून पुढे ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिच्यावर अत्याचार केला. अमोल विठ्ठल पाटील (वय ४० वर्षे, रा. टाऊन सेंटर, सिडको) असे आरोपीचे नाव आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी २०२२ मध्ये तिने एका मुस्लिम मुलासोबत लग्न केले होते. परंतु, काही दिवसांतच त्यांच्यात वाद झाल्याने एप्रिल २०२२ पासून ती त्याच्यापासून विभक्त होऊन एकटीच शहरात रहात आहे. एका खाजगी शिकवणीवर्गात शिक्षिका म्हणून ती काम करते. दरम्यानच्या काळात तिने डेटिंग अॅपवर खाते उघडले होते. त्यावेळी तिची अमोल पाटील याच्याशी ओळख झाली. तसेच तुझा बायोडाटा घेऊन माझ्या ऑफिसला ये असे पाटीलने पीडित महिलेला सांगितले. पीडिता बायोडाटा घेऊन त्याच्या ऑफिसला गेली.
तेव्हा त्याने माझी पत्नी मला सोडून नाशिकला राहते. मी सध्या आई-वडील आणि भावासोबत राहतो. तू मला खूप आवडली असून आपण काही दिवसांनंतर लग्न करू असे म्हटले. तेव्हा तिने त्याला लग्नास नकार दिला. तेव्हा अमोलने तिच्यावर ऑफिसमध्येच बलात्कार करून तिचे फोटो आणि व्हीडीओ तयार केले. कोणाला काही सांगितले तर जगू देणार नाही अशी धमकी दिली. महिलेचे अश्लील फोटो आणि व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पाटील तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. नेहमीच्या या अत्याचाराला कंटाळून अखेर महिलेने एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे गाठून १२ जानेवारीला तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.