कोरेगाव भीमा : शंभूछत्रपतींनी अठरापगड जातिधर्म व बारा बलुतेदारांना सोबत घेत हिंदवी स्वराज्य अबाधित ठेवण्याचे काम केले असल्याने शंभूराजांना केवळ एका समाजापुरते मर्यादित न ठेवता ते स्वराज्याचे आराध्य असल्याचे सांगत वढू-तुळापूरसह संगमेश्वर येथील स्मारक विकसित करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या बलिदान दिनानिमित श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी व कविकलश तसेच शंभू छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन केल्यानंतर वीर बापूजी शिवले व वीरांगना पद्मावती शिवले यांच्या स्मारकाचीही पूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, सरपंच ज्ञानेश्वर भंडारे, उपसरपंच रेखा शिवले, आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, एकही लढाई न हरता शौर्य कसे असू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शंभू छत्रपती राजे होते. वढू-तुळापूर येथे जागतिक दर्जाचे शंभूप्रेमींना अभिमान वाटेल असे स्मारक उभारून भावी पिढीला प्रेरणादायक ठरेल असे होईल. या ठिकाणचा विकास करण्यासाठी अडसर असणा-या केइएम रुग्णालयाला पर्यायी जागा देण्यासाठी शासनाने जागा निश्चिती करण्यात आली आहे. हे रुग्णालय स्थलांतर करून स्मारकाच्या कामास गती येणार आहे.
वढू तुळापूरप्रमाणेच संगमेश्वर येथीलही विकास आराखडा बनविण्यात आला असून त्याठिकाणच्या राजवाडा मंदिर व संरक्षक घाट यांचा विकास करण्यात येणार आहे. छावा चित्रपटांच्या माध्यमातून शंभूराजांचा खरा इतिहास समाजासमोर आला असून तरुण पिढीला प्रेरणास्रोत ठरला आहे. ग्रामस्थ, ग्रामपंचायत तसेच शंभू भक्तांना विश्वासात घेत या ठिकाणचा विकास करण्यात येणार आहे. तुळापूरप्रमाणे वढू या ठिकाणीही समन्वय साधत स्मारकाचे काम करण्यात येणार आहे.