सोलापूर : प्रतिनिधी
धाराशीव जिल्ह्यातील भूम तालुक्यात प्रेम प्रकरणातून अमानुष मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचा रविवार दि. १६ मार्च रोजी सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
माऊली बाबासाहेब गिरी मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या वडिलांनी परंडा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, ३ मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास माऊलीचा त्यास परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील सतीश जगताप आणि इतर सहा ते सात जणांनी लोखंडी रॉड, काठीने जबर मारहाण केल्याचा फोन आला होता. यानंतर त्याला फोन केला असता तो सातत्याने बंद लागत होता. यामुळे बस प्रवासात फिर्यादी वडिलांनी त्यांचे भाऊ आणि मित्राला याबाबतची माहिती देऊन शोध घेण्याची विनंती केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला सात ते आठ जणांनी रॉड, काठी तसेच तीक्ष्ण हत्याराने सर्वांगावर अमानुष मारहाण केली. मारहाणीत तो मृत झाला असे समजून त्याला रस्त्याच्या कडेला फेकून दिले होते. सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते दरम्यान त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यात तो अनेक दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होता. मात्र रविवारी त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी परंडा पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
आई-वडिलांना शोक अनावर
माऊलीच्या मृत्यूनंतर त्याच्या आई-वडिलांना व अन्य नातेवाईकांना शोक अनावर झाला होता. त्याच्या आईने तर ज्या प्रकारे त्याला मारले तसेच सर्व आरोपींना मी मारेन अशी तीव्र भावना व्यक्त केली. तर वडील बाबासाहेब गिरी यांनी मुलीसह सर्व ७-८ आरोपीना मकोका लावण्याची मागणी केली आहे.