मेरठ : जिल्ह्यातील एका गावात अजब-गजब घटना समोर आली आहे. याठिकाणी २५ वर्षीय युवकाचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यातील हैराण करणारा प्रकार म्हणजे सापाने युवकाला १-२ वेळा नव्हे तर तब्बल १० वेळा चावला. त्यानंतर रात्रभर या युवकाच्या मृतदेहाखालीच साप बसून होता. सकाळी कुटुंबातील लोक जागे झाल्यानंतर त्यांनी युवकाची शरीराची कुठलीही हालचाल होत नसल्याचे पाहिले तेव्हा त्याला हलवले असता त्याच्या अंगाखाली साप असल्याचे दिसून आले. हे दृश्य पाहून कुटुंबाला धक्का बसला.
घरात साप पाहून तातडीने सर्प मित्राला पाचारण करण्यात आले. त्यानंतर युवक अमितला रुग्णालयात नेले ज्याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अकबरपूर सादात गावातील अमित हा मजुरी करायचा. शनिवारी रात्री तो रोजसारखे काम करून घरी परतला होता. रात्री जेवण केले आणि झोपायला गेला. मात्र रात्री झोपेतच साप त्याला चावल्याने त्याच्या विष शरीरात पसरले आणि त्याचा मृत्यू झाला. पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये शरीरावर सापाने चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्याशिवाय शरीरावर सर्पदंशाच्या १० खुणाही आढळल्या.
अमित त्याच्या चार भावंडांमध्ये दुस-या नंबरचा होता. त्याला ३ लहान मुले आहेत. अमितच्या अचानक मृत्यूने कुटुंबासह गावक-यांनाही मोठा धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवले होते.