18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदेंबाबत धमकीची पोस्ट करणारा तरुण ताब्यात

मुख्यमंत्री शिंदेंबाबत धमकीची पोस्ट करणारा तरुण ताब्यात

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल समाज माध्यमांवर धमकीचा संदेश अपलोड केल्याप्रकरणी पुण्यातून १९ वर्षीय विद्यार्थ्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीला मुंबईला आणल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

आरोपी संगणक क्षेत्रातील पदवीधर असून त्याने कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यामुळे त्याला संगणक तंत्रज्ञानाबद्दल चांगली माहिती आहे. आरोपी मूळचा नांदेड येथील रहिवासी असून तो सध्या पुण्यामध्ये राहतो. पोलिस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, गुंड कसे बनायचे या विषयावर एक पोस्ट अपलोड करण्यात आली होती. त्याला उत्तर म्हणून या १९ वर्षीय तरुणाने एक पोस्ट केली होती. त्यात या मुलाने ज्याचे लक्ष्य मुख्यमंत्री असेल, त्याला मी बंदूक द्यायला तयार आहे, अशा आशयाची पोस्ट केली होती.

ही पोस्ट पाहिल्यानंतर पोलिसांना एक तक्रार प्राप्त झाली. त्याची पडताळणी केली असता हा प्रकार गंभीर असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे तत्काळ याबाबत समाज माध्यमाच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून संबंधित प्रोफाईलचा वापर करणा-याबाबतची माहिती पोलिसांनी घेतली. त्यावेळी संशयित पुण्यामध्ये असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार एक पथक तातडीने पुण्यात दाखल झाले. त्यांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीत त्याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याला घेऊन मुंबई पोलिसांचे पथक मुंबईला निघाले आहे. मुंबईत आणल्यानंतर याप्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला अटक करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR