सातारा : सेल्फी काढण्याच्या नादात एक तरुणी १०० फूट खोल दरीत पडली, पण पोलीस आणि स्थानिक ट्रेकर्संच्या मदतीने अथक प्रयत्नांची पराकाष्टा केल्यामुळे सुदैवाने बचावली. आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत धबधब्यावर फिरायला आलेली तरुणी, बोरणे घाटात कशी पडली? हा अपघात कसा झाला? तिला कुणी वाचवले हा सगळाच घटनाक्रम थरारक आहे. नसरीन कुरेशी असे या २९ वर्षीय तरुणीचे नाव असून ती पुण्यातील रहिवासी आहे. ०३ ऑगस्ट रोजी पावसातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नसरीन आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत ठोसेघर धबधब्यावर फिरायला गेली होती. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने साता-यातील ठोसेघर धबधबा बंद असल्यानं नसरीन आणि तिच्या ग्रुपने मागे परतण्याचा निर्णय घेतला.
धबधबा बंद असल्याने निसर्ग पर्यटनाची निराशा झाली होती, पण परतीच्या प्रवासादरम्यान तोच आनंद घेण्यासाठी या मित्रांच्या ग्रुपने बोरणे घाटात गाडी थांबवली. सर्वजण पावसाचा आनंद घेत फोटो काढू लागले. हिरवागार निसर्ग पाहून नसरीनलाही सेल्फी घेण्याचा मोह आवरला आहे. नसरीन सेल्फी फोटो काढत होती. मात्र , तेवढ्यात पावसाच्या संततधारेमुळे ओलीव झालेल्या येथील घाटाच्या कठाडावरुन नसरीनचा पाय घसरला. नसरीन १०० फूट दरीत कोसळली. सुदैवाने, काळ आलेला पण वेळ आली नव्हती असेच नसरीनसाठी घडले. खोल दरीत कोसळून नसरीन थोडक्यात बचावली. एका झाडाचा आधार घेऊन ती कशी बशी जीव मुठीत धरुन होती. नसरीनच्या मित्रांनी स्थानिक पोलिसांना घटनेबाबत कळवले. पोलिसांनी तात्काळ बचावकार्यासाठी होमगार्ड आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या टीमला माहिती दिली. त्यानंतर, पोलिस, ट्रेकर्स आणि होमगार्डच्या टीमने तातडीने बोरणे घाटात जाऊन मदतकार्य सुरु केले.
होमगार्ड अविनाश मांडवे यांनी दरीत उतरून तरुणीला दोरीच्या साह्याने सेफ्टी बेल्ट लावून दरीतून बाहेर काढले. या दुर्घेटनेत नसरीन गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने साता-यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागामध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत.
पर्यटनाचा आनंद घेताना काळजी घ्या
नुकताच सोशल इन्फ्लुएंसर आन्वी कामदार हिचा सेल्फीच्या नादात दरीत पडून मृत्यू झाला होता. पावसाळ्यात धबधब्यांवर जाण्याकडे पर्यटकांचा कौल असतो. पण अशा ठिकाणी जाताना सुरक्षित अंतरावरुन निसर्गाचा आनंद घेणे गरजेचा आहे. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह कधीही वाढू शकतो. निसरड्या रस्त्यावरुन तुम्ही घसरु शकता. त्यामुळे अशा ठिकाणी जाताना विशेष काळजी घेण गरजेचे आहे. कारण, थोडीशी चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. आपला निसर्ग पर्यटनाचा आनंद आपल्या स्वकीयांच्या दु:खाचे कारण ठरता कामा नये.