धाराशिव : प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आत्महत्या करण्याचे सत्र थांबायला तयार नाही. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील १९ वर्षीय तरूणाने चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दि. ५ जानेवारी रोजी उघडकीस आली आहे. रोहन राजेंद्र भातलवंडे असे आत्महत्या केलेल्या मराठा समाजातील तरूणाचे नाव असून मी मराठा समाजासाठी बलिदान देत आहे. तरी सरकारला जाग यावी. एक मराठा लाख मराठा असा उल्लेख असलेली चिट्ठी त्याच्या जवळ सापडली आहे.
दहिफळ ता. कळंब येथील रोहन राजेंद्र भातलवंडे याचे १० वी शिक्षण झालेले असून त्याने कृषी पदविका डिप्लोमा कोर्स केलेला आहे. तो नोकरीच्या शोध घेत होता, परंतु त्याला नोकरी मिळाली नाही. शेवटी त्याने तीन गायी सांभाळून गावात दुधाचा व्यवसाय सुरू केला. शिक्षण घेऊनही नोकरी लागत नसल्याने तो चिंतेत होता. मुंबई येथे होणा-या मराठा आंदोलन संदर्भात दहिफळ गावात ३ जानेवारी रोजी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला रोहन उपस्थित होता. शेवटी त्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी दत्ता नानासाहेब भातलवंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.