सोलापूर – बाल निरीक्षणगृहातून शाळेसाठी बाहेर गेलेल्या पाच मुलांना अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून त्यांचे अपहरण केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. कार्तिक, तुषार, अजय, अर्जुन, आणि ऋत्विक अशी अपहरण झालेल्या मुलांची नावे आहेत. याबाबत सुरक्षा रक्षक विजयकुमार मधुकर शिंदे (रा. जुनी मिल चाळ, मुरारजी पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील तिघेजण नववी आणि दहावीच्या वर्गात शिकतात तर दोघे पाचवी आणि सहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत.
कौटुंबिक कारणांमुळे ही मुले लहानपणापासूनच रिमांड होममध्ये राहून शिक्षण घेत आहेत. सकाळी ११.३० च्या सुमारास नेहमीप्रमाणे तयार होऊन ही सर्व मुले सदर बाजार परिसरातील कॅम्प शाळेत जाण्यासाठी म्हणून रिमांड होममधून बाहेर पडली. त्यांच्यासोबत रिमांड होममधील इतरही वर्गात शिकणारी १९ मुले होती. सर्वजण एकाच वेळेस बाहेर पडले. परंतु काही अंतर गेल्यानंतर ही पाच मुले इतर मुलांपासून वेगळी झाली.
परंतु इतर मुलांच्या लक्षात ही बाब आली नाही. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर इतर सर्व १९ मुले रिमांड होममध्ये परतली. मात्र, ही पाच मुले रिमांड होममध्ये आलीच नाहीत. यामुळे रिमांड होममधील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शाळेत धाव घेतली, तेथे त्यांची चौकशी केली. त्यावेळी ती मुले शाळेतच आली नसल्याचे उघड झाले. यामुळे रिमांड होममध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. यानंतर त्यांनी धावाधाव करून मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ते पाचही जण सापडले नाहीत, त्यामुळे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक कुलकर्णी या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.