छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी पणन आणि अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पैठणचे आमदार तथा राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी लोकसभा निवडणूक जिंकल्याने त्यांच्या जागी पालकमंत्री कोण होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपदाची लॉटरी लागेल, असे वाटत असताना अब्दुल सत्तार यांची नियुक्ती निश्चित झाल्याने सिरसाट यांचे स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळाले आहे.
पालकमंत्रिपदी नियुक्तीनंतर अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात शिवसेना कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. एकमेकांना लाडू-पेढा भरवून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
संदिपान भुमरे खासदार झाल्याने अब्दुल सत्तार यांची वर्णी : पैठणचे शिवसेनेचे आमदार संदिपान भुमरे यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देत बंड केले. शिंदे सरकार स्थापन झाल्यावर त्यांना रोहयो मंत्रिपदासह पालकमंत्री पद देखील मिळाले. अनेक वर्षांनी जिल्ह्याला स्थानिक मंत्री या पदावर मिळाला असल्याने विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. मात्र झालेल्या लोकसभा निवडणुकीत संदिपान भुमरे लोकसभा निवडणूक जिंकले. त्यामुळे त्यांच्या जागी कोण असा प्रश्न निर्माण झाला.
त्याचवेळी भाजपा आमदार आणि राज्याचे मंत्री अतुल सावे यांना हा मान द्यावा, अशी मागणी भाजपातर्फे करण्यात आली. जून महिन्यात लोकसभेचे निकाल लागल्यावर अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या काही विधानांमुळे ते पुन्हा काँग्रेसमध्ये जातील, अशी चर्चा सुरू झाली. त्यात आपला एकनाथ शिंदे यांच्याशी प्रासंगिक करार असल्याचे त्यांनी सांगितल्याने ते नाराज आहेत का? असे वाटत होते. मात्र अब्दुल सत्तार यांच्या या खेळीने पालकमंत्रिपद त्यांच्या पदरात पडले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.