कुवेत सिटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दोन दिवसांच्या कुवेत दौ-यावर पोहोचले आहेत. ४३ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आधी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९८१ मध्ये कुवेतला गेल्या होत्या. विमानतळावर नरेंद्र मोदींचे रेड कार्पेटवर स्वागत करण्यात आले.
या दौ-यात नरेंद्र मोदींची कुवेतमध्ये अब्दुल्ला अल बॅरन आणि अब्दुल लतीफ अलानसेफ यांच्याशी खास भेट झाली. अब्दुल्ला अल बॅरन यांनी रामायण आणि महाभारत या भारतीय महाकाव्याचे अरबी भाषेत भाषांतर करून जागतिक साहित्यात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याचे प्रकाशन कुवेतचे प्रमुख प्रकाशक अब्दुल लतीफ अलनेसेफ यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुवेतमध्ये या दोन्ही व्यक्तींची भेट घेतली. अब्दुल्ला अल बॅरन आणि अब्दुल लतीफ अलनेसेफ यांनी नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीदरम्यान अरबी भाषेत अनुवादित रामायण आणि महाभारताच्या प्रतीही दिल्या. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरबी भाषेत अनुवादित केलेल्या या दोन्ही महाकाव्यांवर आपली स्वाक्षरी केली होती.
अब्दुल लतीफ अलनेसेफ म्हणाले, या पुस्तकांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप खूश आहेत. ही माझ्यासाठी खूप सन्मानाची बाब आहे. अरबी भाषेत लिहिलेल्या या पुस्तकामुळे दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतील. या पुस्तकाचा मला सन्मान आहे. या पुस्तकाच्या अनुवादाला जवळपास २ वर्षे लागली आहेत.
कुवेतचे प्रसिद्ध साहित्यिक असण्यासोबतच अब्दुल्ला अल बॅरन हे एक उत्कृष्ट अनुवादक देखील आहेत. रामायण आणि महाभारत या भारतीय महाकाव्यांचे अरबीमध्ये भाषांतर करताना त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान, इतिहास आणि परंपरांचा सखोल अभ्यास केला. त्यांचा अनुवाद हा एक अनोखा अनुभव म्हणून वाचकांनी स्वीकारला. हे यश अरबी भाषिक समाजाला भारतीय महाकाव्यांचे सखोल आणि समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा आहे. साहित्य आणि अनुवादाच्या क्षेत्रात बॅरनचे योगदान कौतुकास्पद आहे. तर अब्दुल लतीफ अलनेसेफ हे कुवेतचे प्रसिद्ध प्रकाशक आहेत.
३० हून अधिक पुस्तकांचे भाषांतर
अब्दुल्ला अल बॅरन यांनी आतापर्यंत ३० हून अधिक आंतरराष्ट्रीय महाकाव्यांचे आणि पुस्तकांचे भाषांतर केले आहे, जे अब्दुल लतीफ अलनेसेफ यांनी प्रकाशित केले आहे. त्यात रामायण आणि महाभारताचाही समावेश आहे. भारतीय संस्कृती आणि सभ्यता आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा हा एक अद्भुत प्रयत्न आहे. दरम्यान, ४३ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांच्या कुवेत दौ-यात या महाकाव्याचे अरबी भाषेत भाषांतर आणि प्रकाशन हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचा एक भाग मानला जात आहे. या प्रयत्नांमुळे भारत आणि अरब देशांमधील साहित्यिक आणि सांस्कृतिक संबंधांना नवी उंची मिळाली आहे.