छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत एसटीच्या भाडे वाढीला मंजूरी देण्यात आली आहे. येत्या २५ जानेवारीपासून ही दरवाढ लागू झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. त्यामुळे हा भाडेवाढ रद्द करण्यात यावी, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोध पक्षनेते अंबादास दानवे यांनी आंदोलन केले.
छ. संभाजीनगर येथील मध्यवर्ती एसटी स्थानकांवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. एसटीची वाढलेली भाडेवाढ रद्द करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अंबादास दानवे यांनी एसटी महामंडळाच्या निर्णयासह राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली १५ टक्के भाडेवाढ ही अन्यायकारक आहे. दोन महिन्यांपूर्वी एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी एसटी नफ्यात असल्याची घोषणा केली होती. याबाबत आकडेवारीही जाहीर केली होती. पण आता एसटीकडून तिकिटांमध्ये १५ टक्के भाडेवाढ करण्यात आली. दुर्दैव म्हणजे एसटी ही भाडेवाढ परिवहन मंर्त्यांनाच माहीत नाही. खातं मिळाल्यानंतर परिवहन मर्त्यांनी केवळ चमकोगिरी केली. कधी बस स्टँडवर गेले तर, कधी एसटीतून प्रवास केला. पण या मंर्त्यांना एसटी प्रवाशांच्या व्यथा समजल्या नाहीत , असे अंबादास दानवे म्हणाले.
‘एसटीची भाडेवाढ हा अन्याय आहे. कारण शहरी भागांत आणि ग्रामीण भागांतील सर्वसामान्यांच्या प्रवासाचे एसटी हे मुख्य साधन आहे. पण हेच सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन महागलं असेल तर, ही भाडेवाढ रद्द झाली पाहिजे. ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका आहे.
आज संपूर्ण मराठवाड्यातील बस स्टँडवर आमचं आंदोलन होत आहे. आज आम्ही केवळ रस्त्यावर बसलो आहोत. पण येणा-या काळात आम्ही मुख्य रस्त्यावर बसू. चक्का जाम करू आणि या सरकारला भाडेवाढ रद्द करायला भाग पाडू , असेही अंबादास दानवे म्हणाले.
२८ जानेवारी रोजी राज्यभर आंदोलन
उद्या (२८ जानेवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरात एसटीच्या भाडेवाढीविरोधात आंदोलन होणार असल्याचे, उद्धव ठाकरेंकडून जाहीर करण्यात आले आहे. भाडेवाढी ही कधीच १५ टक्के होत नाही. २ ते ३ टक्के होते. एसटीचे अध्यक्ष सांगतात की एसटी नफ्यात आहे. पण हे सरकार इतर ठिकाणी पैसे वाटते, प्रलोबन दाखवतात. मग एसटीने काय केले आहे.
सर्वसामान्यांवर अन्याय : अंबादास दानवे
एसटीतून सर्वसामान्य माणूस प्रवास करतो. एसटीतून उद्योजक प्रवास करत नाहीत. एसटीची भाडेवाड सर्वसामान्यांना सोसणारी नाही. त्यामुळे ही भाडेवाढ रद्द केली पाहिजे. नाहीतर हा सर्वसामान्यांवर अन्याय झाला, असे मान्य करावं लागेल. सरकारचे कान, नाक, डोळे आणि तोबाड बंद असतील तर जनतेच्या भावना म्हणून आणि विरोधक म्हणून आम्ही आंदोलन करू , असेही अंबादास दानवे यावेळी म्हणाले.