26.1 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमहाराष्ट्र‘लव्ह जिहाद’ समिती रद्द करा

‘लव्ह जिहाद’ समिती रद्द करा

सपा आमदाराची मागणी

नागपूर : ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाच्या तक्रारी प्रकरणी महिला व बालविकास विभागाने गठीत केलेली ‘आंतरधर्मीय विवाह-परिवार समन्वय समिती’ रद्द करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संबधित विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांना तसे पत्र आमदार शेख यांनी दिले.

दरम्यान, ‘राज्यात लव्ह जिहाद’ची एक लाखांपेक्षा अधिक प्रकरणे आहेत, असा दावा लोढा यांनी केला होता. मात्र, समितीकडे आजपर्यंत केवळ ४०२ तक्रारीच प्राप्त झाल्याच माहिती अधिकारातून समोर आले आहे. या तक्रारीमध्ये केवळ दोन विशिष्ट समुदायाची जोडपी नसून, सर्वधर्मीय जोडपी आहेत. त्यामुळे, ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी गठीत केलेली समिती रद्द करा अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली आहे.

यावेळी देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय, अशासकीय सदस्यांची आंतरधर्मीय विवाह- परिवार समन्वय समिती (राज्यस्तरीय) नेमण्यात आली आहे. तर, मुस्लिम तसेच अल्पसंख्याक समाजावर अन्याय होऊ देणार नाही, अशी आपण कायम भूमिका घेत आला आहात. मात्र, तत्कालीन महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा सदर समिती स्थापन करण्यामागचा हेतू विशिष्ट समाजाविषयी गैरसमज निर्माण करणे, समाजात धार्मीक तेढ वाढवणे, अल्पसंख्याक समाजाला जाणूनबुजून त्रास देणे आणि विभागाकरवी चुकीचे धोरण राबविणे असा असल्याचे प्राप्त तक्रारींच्या अत्यल्प संख्येने सुस्पष्ट झाले आहे.

अशा प्रकारे एका विशिष्ट समाजाला बदनाम करणे हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी परंपरेचा आणि शाहू-फुले- आंबेडकर यांचा वारसा असणा-या राज्याला शोभणारे नाही, असे आमदार रईस शेख यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR